कोल्हापूर :‘सीपीआर’मध्ये होतात दिवसाला १५ डायलेसिस, रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:39 PM2018-02-28T19:39:12+5:302018-02-28T19:39:12+5:30
मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया (सीपीआर)मध्ये रोज १५ रुग्णांचे डायलेसिस केले जाते. गेल्या महिन्यात येथे २४७ डायलेसिस झाले. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे डायलेसिस करायचे झाल्यास दिवसाला किमान पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ‘सीपीआर’ हे गोरगरीब रुग्णांना दिलासा देणारे रुग्णालय ठरत आहे.
गणेश शिंदे
कोल्हापूर : मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया (सीपीआर)मध्ये रोज १५ रुग्णांचे डायलेसिस केले जाते. गेल्या महिन्यात येथे २४७ डायलेसिस झाले. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे डायलेसिस करायचे झाल्यास दिवसाला किमान पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ‘सीपीआर’ हे गोरगरीब रुग्णांना दिलासा देणारे रुग्णालय ठरत आहे.
‘सीपीआर’च्या डायलेसिस विभागाचे ३१ आॅक्टोबर २००३ रोजी तत्कालीन राज्यपाल महंमद फाजल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. येथे गरीब व दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर अतिशय कमी खर्चात किंबहुना मोफत उपचार केले जातात. राज्य शासनाच्या ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून आतापर्यंत सुमारे १९०० रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विषप्राशन केलेल्या रुग्णांचे, जीवरक्षकांचे चार्काेल डायलेसिस केले जाते.
आजपर्यंत १३० रुग्णांवर असे उपचार करण्यात आले आहेत. जीवरक्षक अशा प्लाझमाफेरेसिस उपचार पद्धतीत जी. बी. सिंड्रोममध्ये व इतर आजारांत डायलेसिस केले जाते. आजपर्यंत १६५ प्लाझमाफेरेसिस करण्यात आले आहेत.
खासगी रुग्णालयात नियमित डायलेसिस करणाऱ्या रुग्णाला दिवसाला सुमारे पाच हजार रुपये; तर एच. आय. व्ही.बाधित रुग्णाला डायलेसिस करण्यासाठी ३० हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत इतका खर्च येत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या रुग्णालयात डायलेसिस करणाऱ्या रुग्णांची संख्या महिन्याला २० टक्क्यांनी वाढत आहे.
* डायलेसिस म्हणजे काय..?
ज्या व्यक्तीचे मूत्रपिंड (किडनी) खराब असते, ज्याच्या शरीरातील नत्रयुक्त (नायट्रोजन) घातक द्रव्ये उत्सर्जित होऊ शकत नाहीत, त्याच्या शरीरातील उत्सर्जित द्रव्ये हिमोडायलेसिस या प्रकाराने शरीराबाहेर काढली जाऊ शकतात. डायलेसिस म्हणजे रक्त शुद्धिकरणाची प्रक्रिया होय.
हे असतात रुग्ण..
१) जन्मजात किडनीचे व्यंग
२) जास्तीत जास्त दिवस किडनीला सूज राहणे.
३) संधिवातासारख्या आजारांमध्ये किडन्यांना सूज येते.
४) रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार.
१२ जणांचे पथक
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या चौदा वर्षांत तब्बल १९ हजार ७७१ रुग्णांवर डायलेसिस करण्यात आले. या रुग्णालयात डायलेसिस विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १२ जणांचे पथक कार्यरत आहे.
दिवसाआड डायलेसिस
हिमोडायलेसिस (रेग्युलर पेशंटसाठी) हे आठवड्यातून तीन दिवस म्हणजे एक दिवस आड एक रुग्णाला करावे लागते. चार्कोल डायलेसिस हे विषप्राशन केलेले रुग्ण, सर्पदंश, गंभीर जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर केले जाते.
लहान मुलांना हिमोडायलेसिस ही प्रक्रिया नैसर्गिकदृष्ट्या सहन होऊ शकत नाही. यासाठी बालकांची (शून्य ते पाच वर्षे) नाडी सापडत नाही; म्हणून ‘पेरिटोनियल डायलेसिस’ ही अत्याधुनिक पद्धती वापरली जाते. यंत्रविनाही डायलेसिस केले जाते.
सध्या ‘सीपीआर’मध्ये डायलेसिसची पाच मशीन आहेत. आता एचआयव्ही व काविळीच्या रुग्णांसाठी सहावे स्वतंत्र डायलेसिस मशीन मिळावे यासाठी स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.