कोल्हापूर : खंडणी प्रकरणी तिघांना अटक, योगेश राणेसह ११ जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 07:50 PM2018-08-16T19:50:12+5:302018-08-16T19:52:20+5:30
भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली.
कोल्हापूर : भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली .ही घटना ३० एप्रिल २०१८ ला घडली.या प्रकरणी योगेश राणेसह ११ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
२५ लाख रुपयांच्या खंडणीपैकी ७८ हजार ५०० रुपये संशयितांनी घेतले असून या प्रकरणी ऋषिकेश राजेंद्र फुटाणकर (रा.मालवे कॉलनी,सरवडे,ता.राधानगरी),विशाल बाजीराव पाटील (रा.प्रतिभानगर,मेन रोड ओम गणेश मंगल कार्यालय पाठिमागे) व शेखर दत्तात्रय कलगुटगी ( रा.१३८२ ई वॉर्ड, नवश्या मारुती मंदिरजवळ ,शाहूनगर,कोल्हापूर ) यांना अटक करण्यात आलेली आहे. हे तिघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
या गुन्ह्यातील संशयित योगेश बाळासो राणे (रा.शाहूपुरी,कोल्हापूर) ,आकाश आनंदा आगलावे (रा.न्हावयाचीवाडी, शिळोली ,ता.भुदरगड) ,मारुती मधूकर कांबळे (रा. निगवे खालसा, ता.करवीर) यांचाही गुन्हयात असल्याचे निष्पन्न झाले .योगेश राणे व आकाश आगलावे यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.परंतु,त्यांचा जामीन अर्ज फेटाळ्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की,निगवे खालसा (ता.करवीर) येथील विजय निवृत्ती कांबळे हे बँकेच्या कर्ज प्रकरणांची कागदपत्र पुर्तता करुन देण्याचे काम करतात. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर त्यामधील कमिशन ते घेतात. कांबळे याना अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईल फोन करुन ‘आपल्या भावाचे कर्ज प्रकरण ’करावयाचे आहे असे सांगून ३० एप्रिलला साई मंदिर येथे बोलवून घेतले.
तेव्हा विजय कांबळे हे त्याठिकाणी आले असता, सहा संशयित आरोपींनी त्यांना कारमध्ये जबरदस्तीमध्ये बसवून पळवून नेले.त्यानंतर त्याना ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण करुन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.त्यापैकी संशयितांनी ७८ हजार ५०० रुपये घेतले व सोडून दिले.
घटनेपासून संशयित पसार झाले होते.याचा तपास पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी केला असता ऋ़षिकेश फुटाणकर यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असताना संशयित विशाल पाटील व प्रसाद सुरेश घाटगे (वय २८ ,रा.१३४२ ई वॉर्ड,दत्त गल्ली शाहूनगर) हे दोघे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.त्यापैकी विशाल व शेखर या दोघांना पोलिसांनी अटक केली.
फुटाणकरची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे . विशाल पाटील, व शेखर कलगुटगी या दोघांना न्यायालयाने रविवारी (दि.१९) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.