कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:31 AM2018-03-16T11:31:47+5:302018-03-16T11:31:47+5:30
शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे बिगरशेतीची बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीसह आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे बिगरशेतीची बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीसह आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.
ही सर्व प्रकरणे २००४ ते २००८ या काळातील असून, त्या कालावधीतील अप्पर जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार डी. डी. वळवी यांच्याकडे होता. या कालावधीतील जिल्ह्यातील सर्वच बिगरशेती आदेशाबाबत सत्यता पडताळणी मोहीम हाती घेण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांसह खरेदीदार, एजंटांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील प्रभावी क्षेत्र, तसेच मोठ्या शहरालगतच्या शेतजमिनी बिल्डरांनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी रहिवासी, औद्योगिक तसेच वाणिज्य कारणांसाठी बिगरशेती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येतात; पण २००४ ते २००८ या कालावधीत अनेक जमिनी बिगरशेती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे; पण या बिगरशेतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कागदोपत्री नोंदी नसल्याचे उघडकीस आले आहे.
अशा प्रकारची जिल्ह्यात अनेक प्रकरणे झाल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागल आहे. त्यामुळे या कालावधीतील सर्वच बिगरशेती झालेली प्रकरणे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. तारदाळ, भेंडवडे, भेडसगाव, तसेच इचलकरंजी परिसरातील काही बोगस बिगरशेती झालेली प्रकरणे हाती लागली असून, त्यानंतरच ही प्रकरणे तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
नोंदीच गायब
जिल्ह्यात अशी हजारो प्रकरणे असल्याचे उघडकीस येत असून, त्यांच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याने हे बिगरशेतीचे आदेश मिळविलेच कसे? कोणी दिले? या आदेशावर स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत? याचीही पडताळणी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या चौकशीतून मोठी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अनेक बिगरशेतीचे आदेश बनावट असल्याचेही दिसून येत आहे.
एजंटांची टोळी उघडकीस येण्याची शक्यता
तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांनी त्यांच्या कालावधीत दिलेल्या बिगरशेतीच्या आदेशाची सत्त्यता पडताळणीचे काम सुरू असून, त्यासह बोगस दाखले तयार करून देणारीही एजंटांची टोळी उजेडात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या एजंटांसह बांधकाम व्यावसायिकांत खळबळ माजली आहे.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील प्रामुख्याने बिगरशेतीचे प्रकरणे बोगस असल्याचे तलाठ्यांच्या लक्षात आले आहे. त्याबाबत काही बोगस बिगरशेतीचे आदेशही ताब्यात घेण्यात आले असून, त्याबाबत सत्यता पडताळणी करून फौजदारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या कालावधीतील बिगरशेती झालेल्या प्रकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न करण्याचे आदेश दिले आहेत.
-अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.