कोल्हापूर : वस्तुसंग्रहालयांनी जपलाय सांस्कृतिक वारसा- :दुर्मीळ शिल्प, चित्रकृतींचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:56 PM2019-05-17T23:56:45+5:302019-05-17T23:59:09+5:30
राजर्षी शाहूंची पुण्याई, आदिशक्ती श्री अंबाबाईचे अधिष्ठान, झुळझुळणारी पंचगंगा, रांगड्या कोल्हापूरकरांची मराठमोळी संस्कृती, खवय्यांचे शहर, गुळाचा गोडवा या वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोल्हापूरला फार मोठी पुरातन, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या विविधांगी
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : राजर्षी शाहूंची पुण्याई, आदिशक्ती श्री अंबाबाईचे अधिष्ठान, झुळझुळणारी पंचगंगा, रांगड्या कोल्हापूरकरांची मराठमोळी संस्कृती, खवय्यांचे शहर, गुळाचा गोडवा या वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोल्हापूरला फार मोठी पुरातन, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या विविधांगी वैभवाचे प्रतिबिंब वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून उमटते. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त या वस्तुसंग्रहालयांचा घेतलेला आढावा...
सातवाहनकालीन वैभव जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
टाऊन हॉलमधील कोल्हापूर वस्तुसंग्रहालय म्हणजे सांस्कृतिक खजिनाच आहे. टाऊन हॉल येथील वास्तूचे डिझाईन रॉयल आर्किटेक्ट इंजिनिअर चार्लस मॉट यांनी केले. त्यांच्या देखरेखीखाली गॉथिक वास्तुशास्त्रानुसार १८७६ साली ही इमारत पूर्ण झाली.
संग्रहालयात सात दालने असून, पुरातत्त्व दालनात ब्रह्मपुरी टेकडीवरील उत्खननात सापडलेल्या सातवाहनकालीन वस्तू, मातीची भांडी, मणी, पंचराशी धातू, लोखंडी अवजारे आहेत. धातुदालनात मोठे हंडे, कढई, ताट, वाट्या, घंगाळ, गाडगी, पूजेची भांडी, अंबाबाईची तांब्याची मूर्ती, चवरीवाहिका, गरुडध्वज, ताम्रपट व देवदेवतांच्या मूर्ती आहेत. शिल्पदालनात कोल्हापुरात सापडलेले श्री विष्णू, शिवपार्वती गणपती, नारद-सूर्य-चंद्र, जैन-यक्ष-यक्षिणी, चवरीधर श्रीयंत्र असलेले शिवलिंग यांसह सात शिल्पांचा संच, शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी संगमरवरी दगडात केलेली ब्रिटिश राजघराण्यातील स्त्री-पुरुषांची शिल्पे आहेत. संकीर्ण दालनात कलाकुसरीच्या वस्तू, चंदन, हस्तिदंतात कोरलेली शिल्पे, चिनी फुलदाण्या, वसईच्या किल्ल्यातील घंटा, पॅलेसच्या घड्याळाचा मनोरा, शस्त्रास्त्र दालनात युद्धकालीन शस्त्रे, तलवारी, बंदुका, प्राण्यांच्या शिंगांपासून बनविलेल्या हत्यारांचा समावेश आहे. चित्रदालनात कलातपस्वी आबालाल रेहमानांपासून चंद्रकांत मांडरेंपर्यंतच्या कलाकारांनी रेखाटलेली चित्रे आहेत.
चंद्रकांत मांडरेंचे जीवनपट उलगडणारे कलादालन
मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापुरातील ज्येष्ठ अभिनेते व चित्रकार चंद्रकांत मांडरे यांच्या नावे असलेले कलादालन त्यांचा जीवनपट, अभिनयाची कारकीर्द आणि चित्रांचे सौंदर्य उलगडते. मांडरे यांची अभिनेता म्हणून ओळख असली तरी ते तितकेच चांगले चित्रकारही होते. त्यांनी ४०० च्या वर चित्रे रेखाटली. याशिवाय त्यांची चित्रपट कारकीर्द आणि आयुष्यपट उलगडणारी १५० च्या वर छायाचित्रे आहेत. तसेच मिळालेले पुरस्कारही त्यांच्या राजारामपुरी सातव्या गल्लीतील निवासस्थानी आहेत. येथे ते पत्नी शशिकला यांच्यासोबत राहत होते. मूलबाळ नसल्याने त्यांनी आपला हा ठेवा १९८४ साली शासनाकडे सुपूर्द केला व आपली वास्तू कलादालनासाठी दिली. १९८७ साली ‘चंद्रकांत मांडरे कलादालना’चे उद्घाटन झाले. तेव्हापासून हे कलादालन शासनाच्या वतीने चालविले जाते.
जागतिक संग्रहालय दिन
जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व राजारामपुरीतील चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय पाहण्यासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
वि. स. खांडेकर यांचे समग्र दर्शन घडविणारे संग्रहालय
मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले पारितोषिक मिळवून देणारे साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे जीवन व कार्य मूर्त करणारे वस्तुसंग्रहालय शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये उभारले आहे. हे संग्रहालय साहित्यिकाचे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय सन २००५ मध्ये खुले करण्यात आले.
साहित्यिक खांडेकर यांचा वंशवृक्ष, जन्मघर, बालपण, त्यांना प्रभावित करणारे लेखक, शिरोड्यातील अध्यापन कार्य, साहित्य सप्तपदी, चित्रपटसृष्टी, जीवनातील अविस्मरणीय छायाचित्रे, समग्र साहित्य संपदा, पुरस्कार, पदव्या, हस्तलिखिते गौरवग्रंथ अशा वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. येथे दुर्मीळ ५० छायाचित्रे आहेत.
समग्र पुरस्कार, मानपत्र, साहित्यकृती, प्रत्येक अनुवाद, संशोधन प्रबंध मूळ स्वरूपात आहेत. डी. लिट. पदवी मूळ आहे. शिरोड्यातील घराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लग्नाचे मोडी लिपीतील पत्र आहे. शाळेतील पगार पत्रके आहेत. साहित्यिक खांडेकर यांनी हाताने पेन्सिलच्या माध्यमातून लिहिलेल्या ‘अश्रू’या कादंबरीची मूळ प्रत या ठिकाणी आहे. खांडेकर यांचे भाषण ऐकविण्याची सुविधा येथे आहे.