कोल्हापूर : ‘तिहेरी तलाक’वरून हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचा कट : हुमायून मुरसल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:36 PM2018-02-13T19:36:55+5:302018-02-13T19:45:10+5:30
‘तिहेरी तलाक’ विधेयकाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला जाळ्यात अडकविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. यातून मतांचे धार्मिक धृवीकरण करून हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा कट रचला जात आहे, असा थेट आरोप ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा....’संघटनेचे कार्याध्यक्ष हुमायून यांनी येथे केला. यावेळी मुस्लिम समाजबांधवांनी हा कायदा रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची घोषणा करत तिहेरी तलाक देणार नाही, अशी शपथही घेतली.
कोल्हापूर : ‘तिहेरी तलाक’ विधेयकाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला जाळ्यात अडकविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. यातून मतांचे धार्मिक धृवीकरण करून हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा कट रचला जात आहे, असा थेट आरोप ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा....’संघटनेचे कार्याध्यक्ष हुमायून यांनी येथे केला. यावेळी मुस्लिम समाजबांधवांनी हा कायदा रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची घोषणा करत तिहेरी तलाक देणार नाही, अशी शपथही घेतली.
दसरा चौकातील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा...’ संघटनेतर्फे ‘इजलास-ए-खास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती मौलाना फैयाजूल हक्क सिद्दिकी (आजरा), मौलाना शाकीर हुसेन कासमी (इंडी), तमेजून जमादार, हसिना सय्यद, यास्मिन देसाई, शहनाज नदाफ, हाजरा मोमीन, रेहाना मुरसाल, तनवीर बागवान, मल्लिका शेख आदींची होती. यासाठी पश्चिम महाराष्टÑातून समाज बांधव उपस्थित होते.
कोल्हापुरातील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा...’ संघटनेतर्फे आयोजित ‘इजलास-ए-खास’ या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय गर्दी झाली होती. (छाया : नसीर अत्तार)
मुरसल म्हणाले, तिहेरी तलाकच्या निमित्ताने दोन्ही बाजूचे संधीसाधू लोक समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करतील परंतु समाजबांधवांनी सावध राहिले पाहिजे. होऊ घातलेला हा कायदा महिलांच्या दृष्टीने अन्याय करणारा असून, स्पष्टपणे त्याचा त्याग केला पाहिजे. आपण घटना आणि लोकशाही विचार मनापासून स्वीकारायला पाहिजे, हे मान्य आहे. मात्र बहुमताने आपल्या भावना आणि श्रद्धांची कदर न करता त्याला पायदळी तुडविल्या तरी आपण त्याला शरण जाण्याची गरज नाही.
ते पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांकांना विश्वासात घेणे ही संसद, सरकारसह बहुसंख्य समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे. तसे होत नसेल तर लोकशाही म्हणजे बहुसंख्यांकांची अल्पसंख्यांकावरील हुकूमशाही बनेल. त्याचा आपण विरोध केला पाहिजे.
मौलाना फैयाजूल हक्क सिद्दिकी, मौलाना शाकीर हुसेन कासमी यांनीही आपले विचार मांडले. हसिना मुजावर यांनी प्रास्ताविक केले. तजन्नूम मोळे यांनी स्वागत केले. रेहाना मुरसल यांनी सूत्रसंचालन केले. शहनाज नदाफ यांनी आभार मानले. यावेळी मुन्ना पठाण, सना फणसोपकर, समीर बागवान, मेहबूब बोजगर, आदी उपस्थित होते.
प्रस्तावित कायदा मुस्लिम कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तिहेरी तलाकसंदर्भात प्रस्तावित केलेला कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी जुळणारा नसून, तो मुस्लिम कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा आहे. प्रस्तावित विधेयकातील कलम-४ व कलम-७ हे अन्यायकारक असल्याचे मुरसल यांनी सांगितले.
कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही
या कार्यक्रमात समाजबांधवांनी विविध मागण्या करुन हा कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला. हा कायदा महिलांच्या दृष्टीने कुचकामी असल्याने याबाबतचे प्रस्तावित विधेयक राज्यसभेने नामंजूर करावे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना व सूचनांचा स्वीकार न करता हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. असा सूर यावेळी समाजबांधवातून उमटला.
‘मॉडेल तलाकनामा’
मुस्लिम विवाह म्हणजे पवित्र करार असून याला संपूर्ण कायदेशीर अधिष्ठान आहे. या शादीनाम्यामध्ये पतीकडून तिहेरी तलाक देणार नाही, याची हमी देणारी तरतूद असावी. यासाठी ‘हिंदी है हम...’संघटनेतर्फे एक ‘मॉडेल तलाकनामा’ प्रसिद्ध करेल व असा शादीनामा करण्यासाठी उलेमांचे सहकार्य घेण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर संघटनेतर्फे ‘रेनसॉ फॅमिली कौन्सिली सेंटर’ सुरू करण्यासह महाराष्टत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुस्लिम विद्यापीठ’ बनविण्याचा प्रयत्न राहील, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.