कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:45 PM2018-06-26T18:45:33+5:302018-06-26T18:47:40+5:30
कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली.
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबविल्या जात असलेल्या कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्राथमिक शाळांतील २५ विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे वाटप तसेच कोल्हापूर टॅलेंट सर्चअंतर्गत यश मिळविलेल्या २५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वाटप आमदार पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षा अभियानांतर्गत ११७ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षण समितीमार्फत राबविल्या जात असलेल्या ‘केटीएस’ उपक्रमाचे आमदार पाटील यांनी कौतुक केले. लहानवयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सवय या उपक्रमामुळे लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिका शाळांतून राबविण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आयुक्त अभिजित चौधरी यांनी ‘केटीएस’ उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तोंडओळख लहानवयातच होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या आयुष्याला एक निश्चित दिशा या उपक्रमामुळे मिळेल, असे सांगितले.
शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी महापालिका शाळेत राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच या शाळांचा शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीसाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातात याची माहिती दिली तर पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.
समारंभास उपमहापौर महेश सावंत, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.