कोल्हापुरातील धरणे सुरक्षित, ‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:13 PM2019-07-11T12:13:46+5:302019-07-11T12:18:52+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.
तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील पाटबंधाऱ्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाटबंधारे विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांकडून सर्व धरणांचे आॅडिट करून तत्काळ अहवाल मागविला आहे. कोल्हापुरात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४० च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागामार्फत केली जाते. धरणांचे दरवर्षी दोन वेळा आॅडिट केले जाते.
पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आॅडिट केले जाते. यापैकी एक आॅडिट पाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता; तर दुसऱ्यांदा नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या वर्षीही आॅडिट झालेले आहे.
तिवरे धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी काम सुरू केले असून सर्व धरणे, बंधारे व तलाव १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल तयार झाला आहे. काही किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या स्थानिक पातळीवरच करण्याच्या सूचना दिल्या जातात.
‘दूधगंगा’ व ‘वारणा’ धरणांना गळती आहे. याबाबत धरण सुरक्षितता संघटनेला कळविलेले आहे. त्यांनी केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र, दिल्ली यांच्यामार्फत उपाययोजना सुरू केल्या आहेत. या केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. ते धरणाला भेट देऊन कशा प्रकारे दुरुस्तीचे काम केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतात.
काळम्मावाडीची गळीत कमी करण्यात यश!
काळम्मावाडी धरणाला फार पूर्वीपासून गळती आहे. १९९९ मध्ये प्रतिसेकंद ३८५ लिटर पाणी गळतीतून जात होते. त्यानंतर वेळोवेळी उपाय केल्याने आता केवळ प्रतिसेकंद ८० लिटर पाण्याची गळती राहिली आहे.
धरणक्षेत्रांत रोज दोन-तीन भूकंप
‘दूधगंगा’, ‘वारणा’, ‘कोयना’ या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण परिसरांत रोज दोन ते तीन भूकंप होतातच. ३.५ रेक्टरपेक्षा कमी असल्याने ते जाणवत नाहीत. वर्षभरात भूकंपाचे ६०० धक्के होतात. त्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे होते.
तलाव, बंधारे अंतर्गत सिंचनक्षेत्र
धरणाचा प्रकार बांधण्याची जबाबदारी सिंचनक्षेत्र हेक्टरमध्ये
- पाझर तलाव जिल्हा परिषद ० ते १००
- लघू पाटबंधारा जलसंधारण विभाग १०० ते २५०
- मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभाग २५० ते १०००
- मोठे प्रकल्प पाटबंधारे विभाग १००० च्या पुढे
जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असून वर्षातून दोन वेळा त्यांचे आॅडिट होते. तिवरेच्या घटनेनंतर पुन्हा आॅडिट केले जात असून, त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल.
- एस. एम. गुरव,
उपकार्यकारी अभियंता