कोल्हापूर :धोकादायक जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली, लक्ष्मीपुरीतील घटना : जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:43 AM2018-10-15T11:43:56+5:302018-10-15T11:48:58+5:30
लक्ष्मीपुरीतील वालावलकर कापड दुकानाला लागून असलेल्या पारगावकर यांच्या जुन्या इमारतीची पाठीमागील खचलेली गॅलरी रविवारी दुपारी कोसळली. इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या रहिवाशांना आपत्कालीन विभागाचे पथक, अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच इमारत मालक अनिल पाटगावकर यांना नोटीस पाठवून दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील वालावलकर कापड दुकानाला लागून असलेल्या पारगावकर यांच्या जुन्या इमारतीची पाठीमागील खचलेली गॅलरी रविवारी दुपारी कोसळली. इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या रहिवाशांना आपत्कालीन विभागाचे पथक, अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच इमारत मालक अनिल पाटगावकर यांना नोटीस पाठवून दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
अधिक माहिती अशी, अनिल पाटगावकर यांची लक्ष्मीपुरीत वालावलकर दुकानाला लागून चार मजली पारगावकर कॉम्प्लेक्स आहे. १९३५ साली या इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यामध्ये उदयनराजे रामनाथ पारगावकर, सुप्रिया राजशेखर पारगावकर, अविनाश शांताराम पारगावकर अशी तीन कुटुंबे राहतात.
इमारतीमध्ये अडकलेल्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढताना अग्निशामक दलाचे जवान.
एका कुटुंबाला चौथ्या मजल्यावर दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या; परंतु न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याने त्या खोल्या सोडलेल्या नाहीत; शिवाय तो या ठिकाणी राहण्यासही नाही. त्यामुळे या खोलीच्या पाठीमागे असलेली गॅलरी खचली होती. रविवारी दुपारी ही गॅलरी कोसळून खाली प्रवेशद्वारासमोर पडून मोठा आवाज झाला. त्यामुळे इमारतीमधील लोक भीतीने आरडाओरडा करू लागले. शेजारील लोकांनी तत्काळ अग्निशमन दलास फोन करून बोलावून घेतले.
जवान तानाजी कवाळे, ओंकार खेडकर, केरबा निकम, रजाक मुल्लाणी, सर्जेराव कांबळे, विशाल चौगुले, आदींचे पथक दोन बंब घेऊन दाखल झाले. रुग्णवाहिका व जिल्हा आपत्कालीन विभागाचे अधिकारी प्रसाद संकपाळ पाठोपाठ आले. जवानांनी इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या कुटुंबीयांना सुखरूपपणे खाली आणले. त्यानंतर संपूर्ण इमारतीची पाहणी केली. मोडकळीस आलेला भाग तत्काळ काढण्यात आला.
प्रशासनाची तारांबळ
सध्या शहरात नवरात्रौत्सवाचे वातावरण आहे. कोल्हापुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. अशा वेळी अचानक घडलेल्या या घटनेने प्रशासनाची तारांबळ उडली. लक्ष्मी रोडवर बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी काही काळ या मार्गावरील वाहतूक वळविली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी थांबून होते.
भीतीने वृद्धा बेशुद्ध
गॅलरी कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी भीतीने वृद्धा योगिता पाटगावकर (वय ७०) या बेशुद्ध झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना उचलून सुखरूपपणे खाली आणले. काही वेळाने त्या शुद्धीवर आल्या.