‘मेन राजाराम’मध्ये कोल्हापूर दर्शन संग्रहालय व्हावे, इमारतीच्या संवर्धनाची गरज
By समीर देशपांडे | Updated: December 9, 2024 13:10 IST2024-12-09T13:09:38+5:302024-12-09T13:10:09+5:30
शाळा न हलवताही शक्य

‘मेन राजाराम’मध्ये कोल्हापूर दर्शन संग्रहालय व्हावे, इमारतीच्या संवर्धनाची गरज
समीर देशपांडे
कोल्हापूर : शहराच्या मध्यभागी, अंबाबाई मंदिराच्या परिसरात २२ मोठ्या खोल्यांची असलेली ही इमारत गेली अनेक वर्षे आहे त्या स्थितीत आहे. पाचवी ते दहावी फक्त ७५ विद्यार्थी. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयात ७२९ विद्यार्थी. या सर्वांसाठी ११ खोल्या रोज वापरल्या जातात. उर्वरित खोल्या रिकाम्याच. पाठीमागील बाजूस असणाऱ्या अनेक खोल्यांमध्ये भंगार साहित्य. या ठिकाणी नियोजन करून ‘कोल्हापूर दर्शन’ संग्रहालय केले, तर त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. फक्त हे काम जिल्हा परिषदेने आणि कोल्हापूरच्या नेत्यांनी मनावर घ्यायला हवे.
कोल्हापूर संस्थानात छत्रपती बाबासाहेब महाराज यांनी मूळ नागोजीराव पाटणकर यांना १८ ऑगस्ट १९६६ ला दत्तक घेतले. त्यांचे नामकरण राजाराम महाराज दुसरे झाले. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत बाबासाहेब महाराजांचे निधन झाले आणि राजाराम महाराजांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनीच जुन्या राजवाड्याच्या परिसरात नगारखान्यालगत हायस्कूलची उभारणी केली. हेच ते ‘मेन राजाराम’ हायस्कूल. दुमजली राजवाड्यासारखीच इमारत, त्यातील मोठ्या खोल्या, देखणे सभागृह, वक्राकार जिने, घुमटाकार आकाराचे सज्जे अशा वैशिष्ट्यांची ही इमारत.
गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे या इमारतीचे व्यवस्थापन आहे; परंतु रस्ते आणि गटारीच्या पलीकडे ही संस्था फार कमी वेळा विचार करते. नेतेही त्या पलीकडे जात नसल्याने मग अधिकारी अंगावर काही ओढवून घेत नाहीत; परंतु कोल्हापूरच्या मध्यभागी असलेल्या या सोन्यासारख्या जागेचा एकीकडे उत्पन्नवाढीसाठीही उपयोग करून घेताना ही इमारतही जपली जावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच आता या इमारतीच्या पूर्ण वापराबाबत चर्चा व्हायला हवी. निर्णय व्हायला हवा.
शाळा न हलवताही शक्य
या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सकाळी भरते. ७२९ मुले-मुली शिकत आहेत. त्यांच्यासह माध्यमिक शाळेतील ७५ मुलांची गैरसोय न करता त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा पुरवून अजूनही अनेक खोल्या रिकाम्या आहेत. पाठीमागील बाजूस तर अनेक खोल्यांमध्ये भंगार साहित्य भरून ठेवण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे या साहित्याला हातही लागलेला नाही. त्यामुळे या परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतींमध्ये नको असलेले साहित्य काढून शाळा सुरूच ठेवून या ठिकाणी संग्रहालय उभारणे शक्य आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.
‘पुरेपूर कोल्हापूर’ इथे समजेल
कोल्हापुरात न्यू पॅलेस संग्रहालयात शाहू महाराजांविषयी सर्व काही आहे. मांडरे कलादालनात चित्रे आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर संग्रहालयात खांडेकरांविषयी सबकुछ आहे; परंतु ‘पुरेपूर कोल्हापूर’ची एकत्रित माहिती मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या ठिकाणी उर्वरित जागेत कोल्हापूरचा इतिहास, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक चळवळींपासून ते कुस्तीपर्यंत आणि मर्दानी खेळापासून ते शाहिरीपर्यंत, चित्रपटांपासून ते उद्योगापर्यंतची एकत्रित माहिती या ठिकाणी उत्तम आणि आकर्षकपणे मांडल्यास अंबाबाईला येणारा पर्यटक निश्चित या ठिकाणी भेट देईल यात शंका नाही.