कोल्हापूर : जुन्याच योजना नव्या स्वरुपात, महापालिकेचे ११५९ कोटींचे अंदाजपत्रक ‘स्थायी’ला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:49 PM2018-03-07T16:49:04+5:302018-03-07T16:49:04+5:30
कोणत्याही प्रकारची नवीन करवाढ नसलेले तसेच नाविण्यपूर्ण अशा कोणत्याच योजनेचा समावेश नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील १ हजार १५९ कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी बुधवारी स्थायी समिती सभेत सादर केले.
कोल्हापूर : कोणत्याही प्रकारची नवीन करवाढ नसलेले तसेच नाविण्यपूर्ण अशा कोणत्याच योजनेचा समावेश नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील १ हजार १५९ कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी बुधवारी स्थायी समिती सभेत सादर केले. साडेचार कोटी रुपये खर्चाचा उद्यान विकास प्रकल्प वगळता या नवीन अंदाजपत्रकात गतवर्षातील अपूर्ण राहिलेल्या जुन्याच योजना अगदी जशाच्या तशा नव्या स्वरुपात मांडण्यात आल्या आहेत.
आयुक्त चौधरी यांना सादर केलेल्या अंदाजपत्रकात अव्वल शिल्लकेसह महसुली व भांडवली जमा ५७७ कोटी २४ लाख २८ हजार ८५६ इतकी अपेक्षीत असून ५७३ कोटी ०९ लाख, ४९ हजार रुपये खर्च वजा जाता ४ कोटी १४ लाख ७९ हजार ८५६ रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांचे जमा खर्चाचे स्वतंत्र अंदापत्रक तयार केले आहे. त्यामध्ये जमा ५४६ कोटी ८४ लाख ६२ हजार ६८२ रुपये अपेक्षीत असून खर्च ५३८ कोटी ८९ लाख रुपये दाखविण्यात आलेला आहे. वित्त आयोगांतर्गत जमा ३५ कोटी २५ हजार ५९५ रुपये अपेक्षीत असून खर्च ३३ कोटी २२ लाखाचा आहे. त्यामुळे महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प आणि वित्त आयोग असे मिळून ११५९ कोटी ०९ लाख १७ हजार १३३ रुपयांचे हे अंदाजपत्रक आहे.
शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेले जुनेच प्रकल्प अंदाजपत्रकात नव्या स्वरुपात मांडण्यात आले आहेत. अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, थेट पाईप लाईन योजना, पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन टाकण्याची योजना नवीन आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याचाही त्यांचा इरादा असून त्याकरीता अंदाजपत्रकात काही प्रमाणात तरतुदही केली आहे.
नवीन कोणताही प्रकल्प राबविण्याच्या प्रयत्नात प्रशासन दिसत नाही. नगरोत्थान योजनेचा दुसरा टप्प्याचा आराखडा तयार करुन त्याच्यासंबंधी काहीच प्रयत्न करण्यात आलेला नाही. नगरसेवकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे अंदाजपत्रकात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची करवाढ सुचविलेली नाही.
* अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी -
- विविध विकास कामांकरीता - ८० कोटी
- नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती - ७ कोटी ५० लाख
- नवीन गटर्स तसेच दुरुस्ती - ३ कोटी
- नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती - ७ कोटी ५० लाख
- नवीन गटर्स तसेच दुरुस्ती - ३ कोटी
- औषध खरेदी - १ कोटी
- रुग्णालयास उपकरणे खरेदी - ४० लाख
- नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम - ३ कोटी
- कोंबडीबाजार व्यापारी संकुल - १ कोटी
- ई गव्हर्नन्स सुविधा - ४ कोटी
- के.एम.टी. अर्थसहाय्य - १० कोटी
- अपंग कल्याण निधी - २ कोटी १५ लाख
- महिला बाल कल्याण निधी - ३ कोटी ५५ लाख
- मागासवर्ग निधी - ३ कोटी
- शहरातील चार उद्याने विकासीत करणे - ४० लाख
- भटक्या श्वानांचे निर्बिजिकरण - २५ लाख
* नवीन वर्षातील संकल्प -
- पाणीपट्टी वसुलीसाठी स्पॉट बिलींग व वसुली पध्दत सुरु करणार.
- नवीन इमारतींना घरफाळा लावण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात विशेष कॅम्पचे आयोजन.
- गत वर्षात सुरु झालेले तसेच मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करणार .
- ई गव्हर्नन्स प्रकल्प अधिक सक्षम करणार.
- अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार कामांना सुरवात करणार.
- थकबाकी वसुलीकरीता कायदेशीर कारवाई करणार.