कोल्हापूर : कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरच्या बैठकीत घ्यावा: ‘गोकुळ’दूध वितरकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:42 PM2018-10-08T12:42:41+5:302018-10-08T12:44:33+5:30
‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी येथे केली.
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी येथे केली.
मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई सभागृहात केंद्रचालकांची बैठक झाली. यावेळी कमिशन वाढीच्या प्रमुख मागणीसह दूध वितरकांच्या अन्य मागण्यांबाबत ‘गोकुळ’ दूध संघाने १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मासिक बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शहरातील केंद्रचालकांनी केली.
कमिशन वाढीच्या मागणीसाठी गोकुळच्या शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र, अध्यक्ष विश्वास पाटील यांनी वितरकांशी ताराबाई पार्क येथील कार्यालयात चर्चा करून वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर होणाऱ्या मासिक बैठकीत वितरकांच्या मागण्यांचा ठराव चर्चेसाठी ठेवू, असे सांगितले होते.
वितरकांच्या मागण्या योग्य असून, सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने अंमलबजावणी करावी, असा सूर या बैठकीत उमटला. त्याचबरोबर अध्यक्ष विश्वास पाटील यांना स्मरणपत्रही देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला शहरातील दूध वितरक उपस्थित होते.