कोल्हापूर : ‘वसंतदादा’ कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाबाबत दोन दिवसांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:27 PM2018-04-17T20:27:55+5:302018-04-17T20:27:55+5:30
सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सौरव प्रसाद यांनी दिले.
कोल्हापूर : सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सौरव प्रसाद यांनी दिले.
‘वसंतदादा’ कारखाना गेल्या १५ वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. मार्च २०११ पासून सदर कारखान्याने फंडाची रक्कम कार्यालयाकडे जमा केली नाही. तोपर्यंत जुलै २०१७ पासून दत्त इंडिया कंपनीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. तत्पूर्वीच्या थकीत फंडाची रक्कम नेमकी कोणी द्यायची, हा पेच आहे.
मार्च २०११ पासून न भरलेली रक्कम, दंड व व्याजाची २८ कोटी रुपये देय आहे. याबाबत साखर कामगार युनियन, सांगलीने अनेक वेळा फंडाच्या कार्यालयाकडे पाठपुरावा केला; पण तो बेदखल करण्यात आल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत कार्यालयाच्या दारातून न हलण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. दुपारी आयुक्त सौरव प्रसाद यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत प्रलंबित फंडाची रक्कम भरण्याचे आदेश सबंधितांना देण्याचे आश्वासन सौरव प्रसाद यांनी यावेळी दिले. जर या कालावधीत फंडाची रक्कम वर्ग झाली नाही तर १ मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.
यावेळी युनियनचे सरचिटणीस प्रदीप श्ािंदे, अध्यक्ष पोपटराव पाटील, विलास पाटील, शिवाजी पाटील, अशोक साळुंखे, सर्जेराव भोसले, सुनील घोरपडे, संजय खराडे, राजू मुल्लाणी, रामभाऊ पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप गोरे, आदी उपस्थित होते.