कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्यांनी पाडले कांदा सौदे बंद, व्यापाऱ्यांना विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:03 PM2018-02-07T19:03:43+5:302018-02-07T19:29:40+5:30
दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.
कोल्हापूर : दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १२ हजार पिशव्यांची आवक होते. बुधवारी तब्बल १५ हजार ४७९ पिशव्यांची आवक झाल्याने दरात थोडी घसरण झाली. गेले चार दिवस चांगल्या कांद्याला २३ ते २४ रुपये किलो दर राहिला; पण बुधवारी चांगल्या कांद्याचा दर २० रुपयांपर्यंतच थांबल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी समिती कार्यालयाकडे मोर्चा वळवत प्रशासनास जाब विचारला. समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक नंदकुमार वळंजू, बाबूराव खोत, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक यांनी व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली.
यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असल्याचा आरोप केला. सोमवार, मंगळवारी २५ रुपये किलो असणारा कांदा एकदम १७ रुपयांवर कसा आला? अशी विचारणा करीत ‘दर सुधारले नाहीत तर सौदे सुरू होऊ देणार नाही,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
शेतकरी आमचे दैवत आहेत. तुम्ही आलात तरच आमची दुकाने सुरू राहतील, असे व्यापारी अशोककुमार आहुजा यांनी सांगितले. पुण्यासह इतर बाजारपेठांतील आजचे दर पहा, सगळीकडेच दर घसरल्याने येथे कोणीही दर पाडत नसल्याचे आहुजा यांनी सांगितले. २० रुपयांच्या खाली सौद्यात दर येणार नाही, याची खात्री द्या; मगच सौदे सुरू करा, यावर शेतकरी ठाम राहिले.
सौद्यात तुम्हाला अपेक्षित दर मिळाला नाही तर विक्री करू नका, तुमचा कांदा व्यापाऱ्यांच्या गोदामात सुरक्षित राहील. त्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही. शेतकऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय समिती करील, असे सभापती कृष्णात पाटील, नंदकुमार वळंजू व मोहन सालपे यांनी सांगितले. त्याला व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शविल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.
बंदनंतर तोच दर!
दरातील घसरणीचा निषेध करीत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीने हस्तक्षेप केल्यानंतर सौदे सुरू झाले; पण दरात फारसा फरक पडला नाही.
व्यापाऱ्यांनी लूट सुरू केली असून, सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. आवक वाढली तरी एका दिवसात किलोमागे आठ रुपयांची घसरण होते कशी? किमान २५ रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.
- संपत शिरसाट,
शेतकरी, श्रीगोंदा