कोल्हापूर : पारंपरिक अधिक वाणाला नावीन्याचा साज, चोख सोने, चांदीसह फॅन्सी वस्तूंना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:08 AM2018-06-09T11:08:47+5:302018-06-09T11:08:47+5:30

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात जावयाला आणि लेकीला दिले जाणारे अधिक वाण यंदा नावीन्याचा साज लेवून आले आहे. वाण म्हणून चांदीचे पूजेचे साहित्य भेट देण्याबरोबरच त्यांच्या भविष्याची तरतूद व्हावी यासाठी चोख चांदी किंवा सोन्याकडे वधू कुटुंबाचा कल आहे. नव्या पिढीचा बदलता कल लक्षात घेऊन सुवर्ण-चांदी व्यावसायिकांनी आधुनिक जावयांना भावतील अशा लाईटवेट फॅन्सी अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंची निर्मिती केली आहे.

Kolhapur: Demand for fancy goods with traditional jewelery, elegant gold and silver | कोल्हापूर : पारंपरिक अधिक वाणाला नावीन्याचा साज, चोख सोने, चांदीसह फॅन्सी वस्तूंना मागणी

कोल्हापूर : पारंपरिक अधिक वाणाला नावीन्याचा साज, चोख सोने, चांदीसह फॅन्सी वस्तूंना मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे पारंपरिक अधिक वाणाला नावीन्याचा साजचोख सोने, चांदीसह फॅन्सी वस्तूंना मागणी

कोल्हापूर : दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात जावयाला आणि लेकीला दिले जाणारे अधिक वाण यंदा नावीन्याचा साज लेवून आले आहे. वाण म्हणून चांदीचे पूजेचे साहित्य भेट देण्याबरोबरच त्यांच्या भविष्याची तरतूद व्हावी यासाठी चोख चांदी किंवा सोन्याकडे वधू कुटुंबाचा कल आहे. नव्या पिढीचा बदलता कल लक्षात घेऊन सुवर्ण-चांदी व्यावसायिकांनी आधुनिक जावयांना भावतील अशा लाईटवेट फॅन्सी अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंची निर्मिती केली आहे.

अधिक महिना हा श्रीकृष्णाच्या आराधनेला महिना मानला जातो. या काळात जावयाला अधिक वाण म्हणून चांदीचे पूजेचे ताट, निरांजन, समई, तांब्या, पळी-पंचपात्र, ताम्हण असे पूजेचे साहित्य, तर मुलीला चांदीची जोडवी दिली जातात. नवीन लग्न झालेल्या कुटुंबात ही रीत आवर्जून पाळली जाते.

या वाणात पूजासाहित्याला महत्त्व असले तरी त्याचा उपयोग जावयाला फारसा होत नाही. त्यामुळे जावयाला उपयुक्त ठरतील अशा वस्तू देण्याकडे वधूकडील कुटुंबीयांचा कल आहे. त्यात चांदीचे पेन, डिझाईनचे ब्रेसलेट, फोटो फ्रेम, बेडरूममध्ये ठेवण्यासाठी किचन सेट, जग सेट, ग्लास, बाऊल, फुलपात्र अशा साहित्याचा समावेश आहे. नवदाम्पत्याच्या भविष्याची तरतूद म्हणून चोख सोने, चांदी, वळे, कॉईन, बिस्कीट अशा वस्तू दिल्या जात आहेत.

तुलनेत चांगली उलाढाल

तीन वर्षांपूर्वी अधिक महिना आला होता तेव्हा नोटाबंदीचा परिणाम सोसत असलेल्या बाजारपेठेत चांदीनेही किलोमागे ६० हजारांचा उच्चांकी दर गाठला होता. त्यामुळे या काळात चांदीच्या अलंकारांची उलाढाल झाली नाही. सध्या मात्र चांदीचा दर ३९ हजार रुपये असल्याने आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबांमध्ये जावयाला मोठी वस्तू देण्याकडे कल आहे.

 


वाण म्हणून पारंपरिक वस्तू देण्याऐवजी आत्ताच्या मॉडर्न पिढीला आवडतील असे चांदीचे नावीन्यपूर्ण अलंकार व भेटवस्तूंवर भर दिला जात आहे. ग्राहकांची ही पसंती ओळखून लाईटवेट फॅन्सी वस्तूंची निर्मिती केली असून, त्याला अधिक मागणी आहे.
- चेतन शहा (व्यावसायिक)


महागाई असली तरी ग्राहकांची क्रयशक्ती वाढली आहे; त्यामुळे अधिक वाण म्हणून लहान वस्तू देण्याऐवजी उपयोगी ठरतील असे साहित्य, तसेच चोख सोने-चांदी देण्याकडे कल आहे.
- भरत ओसवाल (व्यावसायिक)
 

 

Web Title: Kolhapur: Demand for fancy goods with traditional jewelery, elegant gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.