कोल्हापूर : भाजप सरकारविरोधात वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:36 AM2018-04-03T11:36:57+5:302018-04-03T11:36:57+5:30
केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले.
कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले.
सकाळी अकराच्या सुमारास सर्व वैद्यकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. त्यानंतर सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, सचिव विजय धनवडे, प्रशांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार गुरू बिराजदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकार हे गेल्या चार वर्षांपासून कामगारांच्या कायद्यांमध्ये बदल करून कामगारांचे हक्कच काढून घेत आहे तसेच कॉर्पाेरेट कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेऊन नवीन कायदा अंमलात आणण्याचा घाट या सरकारकडून सुरू आहे.
जे कामगार सध्या कायमस्वरूपी आहेत त्यांना नवीन कायद्यांमुळे बोनस, ईएसआयसी, पीएफ, यासारखे लाभ मिळणार नाहीत तसेच ट्रेड युनियन बनविणे व ती कामगारांच्या कल्याणासाठी चालविणे हा लढण्याचा हक्कच काढून घेतला जात आहे. यामुळे कंत्राटीकरणास बळ मिळणार असून कॉर्पाेरेटवाल्यांना मनमानी करायला एकप्रकारे मदतच होणार आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत.
आंदोलनात विवेक गोडसे, सचिन पाटील, अविनाश सोहनी, प्रसाद देसाई, प्रीतम कासार, संग्राम बोंबाडे, दिनेश पाटील, विकास पाटील, नामदेव उरूणकर आदी सहभागी झाले होते.