कोल्हापूर : चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:28 AM2018-10-26T11:28:22+5:302018-10-26T11:30:09+5:30
चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
कोल्हापूर : चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करताना ‘पोटॅशिअम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशिअम परक्लोराईड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते.
भारतात रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे; त्यामुळे केंद्र सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली आहे, तरीही अवैध मार्गाने हे फटाके देशात येऊन त्याची विक्री होत आहे, तरी त्यावर कारवाई करून त्याच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्याचबरोबर फटाक्यांवरील चित्रांद्वारे हिंदू देवदेवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबनाही थांबवावी.
शिष्टमंडळात मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, किशोर घाटगे, राजू यादव, सुरेश चव्हाण, शरद माळी, मनोहर सोरप, आदींचा समावेश होता.