कोल्हापूर : रताळे, वरी, शाबूदाण्याला मागणी, महाशिवरात्रीमुळे बाजारात गर्दी : भाज्यांचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:20 PM2018-02-12T15:20:44+5:302018-02-12T15:23:43+5:30
दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.
कोल्हापूर : दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.
लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, पाडळकर मार्केट, नार्वेकर मार्केट, आदी बाजारांत उपवासाच्या पदार्थांना जास्त मागणी होती. किरकोळ बाजारात रताळ्याचा प्रतिकिलो दर २० रुपये, शाबूदाणा ६० पासून ७२ रुपये, वरी ६० पासून ८० पर्यंत, तर शेंगदाणे ८० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत होते. राजगिरा लाडू (दहा नग) दर २० रुपये होता.
त्याचबरोबर काजू ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत, बदाम ५०० ते ८०० रुपयांच्या घरात, तर पिस्ता १६०० रुपये प्रतिकिलो होता. खारी २०० ते ४०० रुपये, सुके खोबरे १८० रुपये, तांदळाचे दर ४० रुपये ते १४० रुपयांपर्यंत, तर शेंगतेल १२५ रुपये असा प्रतिकिलोचा दर होता. तसेच कोबी, वांगी, ओली मिरची, टोमॅटो, कारली, भेंडी, वरणा, दोडका, काकडी, वाल, बिनीस, हिरवा टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, आले आणि मेथी, पालक व पोकळ्याचा दर स्थिर होता. ओल्या वाटाण्याचा दर कमी झाला आहे. तो १८ रुपये प्रतिकिलो असा होता. लिंबूची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. २२५ रुपयांना त्याचे चुमडे होते.
फळबाजारात मोसंबी, माल्टा, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळिंब, अननसालाही मागणी वाढली आहे. द्राक्षे ६० रुपये, मोसंबी ५० ते ५५ रुपये, चिक्कू ३० रुपये, पेरू ४० ते ४५ रुपये, सफरचंद ८० ते १०० रुपयांच्या घरात होते. डाळिंब ४० रुपये प्रतिकिलो होते. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीला मागणी वाढली होती. बॉक्सचा दर १०० रुपये होता. एकंदरीत, सणामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होती.
रताळ्यांची आवक वाढली
महाशिवरात्री सणानिमित्त घाऊक बाजारात रताळ्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. रताळ्यांचा दर दहा किलोंना १८० रुपये असा होता. ऐन सणात रताळ्यांचा दर उतरल्याने ग्राहकांना याचा फायदा झाला.
कांदा-बटाटा, गुळाचा दर स्थिर
कांदा, बटाट्यासह लसूण, गूळरव्यांचा दर स्थिर होता. कांदा २० रुपये, बटाटा दहा रुपये, तर लसूण २२ ते २५ रुपये असा प्रतिकिलो दर होता.