कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाची पंचगंगा नदीत प्रात्यक्षिके, सदैव सज्ज रहा : महापौर, आयुक्तांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:16 PM2018-06-02T14:16:39+5:302018-06-02T14:16:39+5:30
कोल्हापूर शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली.
कोल्हापूर : शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नैसर्गिक संकट निर्माण झाले तर त्याच्याशी सामना करण्यासाठी अग्निशमन दल अद्ययावत उपकरणांसह सजग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. ही प्रात्यक्षिके पाहून महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जवानांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे असलेल्या उपकरणांचा उपयोग आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याची नदीघाटावर पंचगंगा प्रात्यक्षिके करून दाखविताना स्थानक अधिकारी मनीष रणभिसे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांतर्फे पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करून आपण कोणत्याही संकटाचा मुकाबला करू शकतो, हे दाखवून दिले जाते.
पंचगंगा नदीघाटावर अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, रेस्क्यू व्हॅनसह जवान नदीकाठावर पोहोचले. पाठोपाठ महापौर बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरीदेखील दाखल झाले. नदीकाठावर नैसर्गिक आपत्तीच्या काळात लागणाºया उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या सर्व उपकरणांची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली.
एखाद्या घराचा स्लॅब कोसळला असेल आणि त्याखाली लोक सापडले असतील तर त्यांची तत्काळ सोडवणूक करण्याकरिता वापरले जाणारे हायड्रॉलिक जॅक, वेगवेगळ्या प्रकारचे कटर, स्पे्रडर यांचीही प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. त्यानंतर नदीत बुडणाऱ्या व्यक्तींंना कशा प्रकारे वाचविले जाते, हेही दाखविण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची पाहणी केली.
महापौर, आयुक्तांनी नदीत मोटरबोटमधून फेरफटकाही मारला. यावेळी प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, रवींद्र ठोंबरे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असणारी उपकरणे
जनरेटर - ३
रेस्क्यू बेल्ट - १२
बी. ए. सेट - ११
एस्टिंग्युशर - ३२
हेल्मेट - ३२
पोर्टेबल पंप - ५
फायर सूट - ८
लाईफ जॅकेट - ६०
सेफ्टी नेट -६
टर्बो नोझल - ६
लिफ्टिंग बॅग - १
हायड्रॉलिक स्पेडर, कटर, जॅक
सॉ कटर्स - ७
लाईफ बॉय - १५
स्लॅब कटर - २
मॅन्युअल आॅपरेटेड स्प्रेडर व कटर
रेस्क्यू बोट - ३
फ्लोटिंग पंप - ३
बॅटरी - ४
मेगा फोन - ४