कोल्हापूर : चार दिवसांत डेंग्यूच्या ३४ रुग्णांची भर, डासांचा प्रभाव आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:18 PM2018-08-17T13:18:07+5:302018-08-17T13:21:20+5:30
डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.
कोल्हापूर : डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.
कोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला आहे. स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या आणि दिवसा नागरिकांना चावणाऱ्या या डासांचा बीमोड करणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह शहरवासीयांना अशक्य झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, औषध फवारणीसहा जनजागृतीचे काम हाती घेतले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अकरा पथके रोज विशिष्ट भागांत जाऊन घरांचे सर्वेक्षण करतात. नागरिकांना डेंग्यूचा डासांचा बीमोड करण्यासाठी कशा प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे, याची माहिती देतात. प्रत्येक घरात जाऊन जेथे डेंग्यूच्या अळ्या, अंडी आढळतात, तेथे औषध फवारणी केली जाते.
परंतु सगळे प्रयत्न करूनही डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती व त्यांचा डंख काही कमी झालेला नाही. जुने रुग्ण बरे होत असताना तेवढीच रुग्णसंख्या नव्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांसह नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.
महापालिकेच्या पथकांकडून गुरुवारी भोसले पार्क, सदर बाजार, कनाननगर, नागाळा पार्क, राजेंद्रनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, सोमवार पेठ, रमणमळा, आदी परिसरांतील ४६७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाण्याचे ८०० कंटेनर तपासले गेले. त्यांपैकी १७ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.
दोन बांधकाम साईट तपासण्यात आल्या. तेथे दूषित पाणीसाठे असल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयात १५ डेंग्यूसदृश रुग्ण मिळून आले; तर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील लॅबमध्ये गेल्या चार दिवसांत तपासणीला आलेल्या रुग्णांपैकी ३४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.