दहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:01 PM2019-08-31T12:01:10+5:302019-08-31T12:07:12+5:30
जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.
कोल्हापूर : जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.
विभागात २०.०५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १८.७० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १४.०५ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ४.६५ टक्क्यांनी अधिक आहे.
शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी पत्रकार परिषदेत या निकालाची माहिती दिली. यावेळी सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले उपस्थित होते. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १३०९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १९८७ जण उत्तीर्ण झाले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९५ टक्क्यांनी निकाल घटला आहे. विभागात सांगली १२.९२ टक्क्यांसह द्वितीय आणि सातारा १२.४२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. या परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रांवर १५ गैरमार्गांची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक १३ प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
साताऱ्यामध्ये दोन प्रकरणे घडली आहेत. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ९ सप्टेंबरपर्यंत आणि छायाप्रत मिळविण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील, असे सचिव आवारी यांनी सांगितले.
जिल्हानिहाय निकाल
जिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
कोल्हापूर ८९० २०.५
सांगली ५७४ १२.९२
सातारा ५२३ १२.४२
विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १३८६२
- परीक्षेला बसलेले विद्यार्थी : १३०९४
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : १९८७
- उत्तीर्ण मुलांची संख्या : १३९५ (परीक्षा दिलेली मुले : ९९२९)
- उत्तीर्ण मुलींची संख्या : ५९२ (परीक्षा दिलेल्या मुली : ३१६५)
श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
- प्रथम श्रेणी : ४
- द्वितीय श्रेणी : ६
- उत्तीर्ण श्रेणी : १९७७
फेब्रुवारी-मार्चदरम्यान झालेल्या परीक्षेत ज्या विभागीय मंडळांचे निकाल चांगले लागले होते, त्या मंडळांमध्ये जुलैमधील या परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. त्यात कोल्हापूर, कोकण, आदींचा समावेश आहे. निकालाबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील, त्यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा. पुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या दहावी, बारावीच्या गुणपत्रिका वाहून गेल्या अथवा खराब झाल्या असतील, तर त्यांना त्या बदलून दिल्या जातील.
- एस. एम. आवारी,
सचिव, कोल्हापूर विभाग.