कोल्हापूर उपशहर अभियंत्यास सभेबाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:50 AM2017-11-04T00:50:05+5:302017-11-04T00:52:18+5:30
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यातील अतिक्रमण कारवाई करण्यास गेलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना ज्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले त्यांच्यावर काय कारवाई करणार,
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यातील अतिक्रमण कारवाई करण्यास गेलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना ज्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल करत ताराराणी-भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कारवाई न करताच दबावाला बळी पडून माघारी फिरलेल्या उपशहर अभियंता एस. के. माने यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
गाडी अड्डा येथील अतिक्रमण विरोधी कारवाई का थांबविण्यात आली, अशी विचारणा दिलीप पोवार यांनी सभागृहात केली. त्यावेळी एका अधिकाºयाने महापौर हसिना फरास यांना चार-पाच दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती केल्यामुळे ही कारवाई थांबविली. तथापि, लवकरच ही कारवाई पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली जाईल, असे सभागृहात सांगितले. त्यामुळे संतप्त भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी प्रशासनाला घेरले. वृषाली हॉटेलच्या बांधकामात हस्तक्षेप केला म्हणून जर एका नगरसेवकावर कारवाईचा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला जात असेल तर मग आजही ज्यांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केला त्यांच्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा सत्यजित कदम, आशिष ढवळे यांनी केली. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही केली; परंतु त्याला कोणीही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे संतप्त सदस्यांनी उपशहर अभियंता माने यांना तुम्ही सक्षम नाहीत, असे सांगत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.
शहरभर अतिक्रमणाची कारवाई करणार होता, त्याचे काय झाले. प्रत्येक चौक व रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे याकडे आशिष ढवळे यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे नियोजन केले असून शहरातील पोलीस निरीक्षकांशी बंदोबस्ताबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ई वॉर्डमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. फिरता जनरेटर घेण्याबाबत सांगितले होते. नऊ महिने हा विषय चर्चेत आहे. अजून प्रस्ताव आलेला नाही. लोक पाण्यासाठी आमच्या दारात येतात. प्रशासन गांभीर्याने काम करणार की नाही, अशी विचारणा उमा इंगळे, राहुल माने यांनी केली. पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने झाला आहे. प्रत्येक ठिकाणी पंपिंग स्टेशनजवळ कमी-जास्त क्षमतेच्या मोटरी असल्याने किती के.व्ही.चा जनरेटर घ्यावा याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले. नगरोत्थान अंतर्गत केलेले बरेचशे रस्ते वाहून गेले आहेत. ठेकेदारांवर काय कारवाई केली, अशी विचारणाही यावेळी झाली. चर्चेत नीलोफर आजरेकर, रिना कांबळे, मनीषा कुंभार यांनीही भाग घेतला.
अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच; आठ दिवसांची मुदत
गेल्या वर्षभरात शहरात झालेली अतिक्रमणे, चौका-चौकांत लावण्यात आलेल्या केबिन आणि त्याविरुद्ध होत असलेल्या तक्रारी याची गंभीर दखल आयुक्त अभिजित चौधरी यांनी घेतली असून लवकरच एक विशेष मोहीम राबवून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची अनधिकृत केबिन, अतिक्रमणे आहेत त्यांनी आठ दिवसांत काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. महानगरपालिकेच्या अनुमतीशिवाय शहरातील फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा आदी ठिकाणी ज्यांनी अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे, अनधिकृत शेड, बांधकाम केलेली आहेत तसेच जी अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका आपल्या यंत्रणेद्वारे केव्हाही व्यापक मोहिमेद्वारा हटविण्याची कार्यवाही सुरू करणार आहे, असे महापालिकेतर्फे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.