कोल्हापूर : व्यवहार चातूर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा : इंद्रजित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:12 PM2018-05-26T16:12:41+5:302018-05-26T16:16:54+5:30
लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
कोल्हापूर : लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित व्यवहार चातुर्य व प्रेरणास्त्रोत या दोन पुस्तकांचे प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योगपती रामप्रताप झंवर होते. व्यासपीठावर अक्षरदालनचे अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, आपल्या जीवनाचे यश कशात आहे प्रत्येकाने ठरवले पाहीजे. पैसा आणि व्यवहाराने श्रीमंत होणे म्हणजे यश नव्हे कारण आजही श्रीमंत माणसांच्या नव्हे तर आयुष्यभर निर्विकार राहिलेल्या संतांच्या पालख्या उचलल्या जातात. सत्ता, संपत्ती, मान, प्रतिष्ठा, सौंदर्य नश्वर आहे. दुसऱ्यांचे जीवन समृद्ध करताना आपलेही आयुष्य नितीमुल्याने जगा, कुटूंब व्यवस्था आणि नात्यांचे महत्व जाणा.
सुनिलकुमार लवटे म्हणाले, व्यवहार चातूर्य आणि प्रेरणास्त्रोत ही पुस्तके म्हणजे आयुष्याचे सिंहावलोकन आहे. ही पुस्तके नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आणि ज्येष्ठांसाठी जगण्याच्या वाटा सांगणारे आहेत.
रामप्रताप झंवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रसन्न देशिंगकर यांनी सुत्रसंचलन केले. अमेय जोशी यांनी आभार मानले.
कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात शनिवारी डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे, उद्योगपती रामप्रताप झंवर उपस्थित होते.