कोल्हापूर : कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:57 PM2018-05-15T17:57:01+5:302018-05-15T17:57:01+5:30
कोल्हापूर : भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीपात्रात अंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकर संजय कांबळे (वय २२, रा. महेकर, ता. भालकी, जि. बिदर) असे त्याचे नाव आहे.
डोळ्यासमोर प्रभाकर बुडालेला पाहून त्याच्या भावासह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला. त्यांनी सीपीआर रुग्णालय आवारात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, प्रभाकर कांबळे हा गावात शिवणकाम करीत होता. त्याचा थोरला भाऊ महादेव याचे दि. ८ मे रोजी लग्न झाले. भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी तो नववधूंसह नातेवाईकांसोबत ‘अंबाबाई’ व ‘जोतिबा’ दर्शनासाठी मंगळवारी पहाटे कोल्हापूरला आला होता.
पंचगंगा नदी घाटावर अंघोळीसाठी सर्वजण उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने प्रभाकर बुडाला. आजूबाजूच्या नातेवाईकांची आरडाओरड ऐकून नेहमी याठिकाणी अंघोळीला येणारे जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी शोध घेतला असता, अवघ्या पंधरा मिनिटांत प्रभाकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणला. नवस फेडायला आलेल्या कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.