कोल्हापूर : ध्यानचंद हॉकी स्टेडियम ‘अॅस्ट्रोटर्फ’चा मार्ग मोकळा, संभाजीराजे यांचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:13 AM2018-11-17T11:13:34+5:302018-11-17T11:18:30+5:30
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या मैदानासाठी आवश्यक निधीची त्वरित तरतूद करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा अॅस्ट्रोटर्फ दृष्टिक्षेपात येणार आहे.
कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या मैदानासाठी आवश्यक निधीची त्वरित तरतूद करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा अॅस्ट्रोटर्फ दृष्टिक्षेपात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ मैदान मिळावे, याकरिता हॉकीप्रेमी प्रयत्न करीत होते. खासदार संभाजीराजे यांनीही मागील वर्षापासून त्याचा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत ‘खेलो इंडिया’अंतर्गत या मैदानासाठी निधी द्यावा, असे सुचविण्यात आले. मात्र, राज्य शासनाकडून याबाबतचा प्रस्तावच केंद्राकडे पाठविला नसल्याचे पुढे आले.
पुढे हा प्रस्ताव राज्य शासनाने पाठविला. त्यातून हे मैदान तयार करून दिले जाईल, असे त्यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री राठोड यांनी सुचविले होते. तेव्हा राज्याकडून हा टर्फचा प्रस्ताव पाठविलेला नव्हता. बैठकीनंतर तो केंद्राकडे पाठविण्यात आला. मात्र, याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. १५) ला क्रीडा मंत्रालयाच्या अवर सचिवांना दूरध्वनी करून विचारणा केली. त्यावर त्यांनी निधीची कमतरता असल्याचे सांगितले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राठोड यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान निधी मिळाला नसल्याचे त्यांच्या समोर आणले. त्यावर स्वत: राठोड यांनी तत्काळ निधी देण्याचे क्रीडा मंत्रालयाला निर्देश दिले. यासह निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही दिली. त्यामुळे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिन्याभरात हा निधी उपलब्ध होईल व हॉकीपटूंची गैरसोय दूर होऊन कोल्हापूरला अॅस्ट्रोटर्फ मिळणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.