Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 04:33 PM2023-12-21T16:33:37+5:302023-12-21T16:36:56+5:30

व्ही. जे. साबळे तुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता. राधानगरी ) ...

Kolhapur Direct pipeline burst for the third time in Radhanagari taluka | Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान

Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान

व्ही. जे. साबळे

तुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता. राधानगरी ) येथे आज पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली. या गळतीमुळे आसपासच्या परिसरातील  शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सायंकाळी पाच नंतर गळती कमी झाली. मात्र थेट पाईपलाईनमुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा केली जात आहे. या परिसरात गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा पाईपलाईनला गळती लागली आहे.

कोल्हापूर शहराला  काळम्मावाडी धरणाचे पाणी देण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्चून पाईपलाईन योजना अखेर सुरू झाली. मात्र या योजनेला गळतीचे ग्रहण लागले आहे. आज गुरुवारी मध्यरात्री तुरंबे कपिलेश्वर मार्गावर बाळासाहेब शेटगे यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आणि पाईपलाईनमधून पाणी वाहू लागले. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय या परिसरातील ऊस पिकामध्ये पाणी शिरल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. 

गळती लागल्याचे लक्षात येताच नेमके पाणी बंद कसे करायचे कोणाशी संपर्क साधायचा याबद्दल कोणतीही पूर्व सूचना देण्यासाठीची तरतूद या थेट पाईपलाईनच्या मार्गावर कुठेही नसल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा ग्रामस्थांतून होत आहे.

कोल्हापूर शहराला थेट पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु थेट पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि यामध्ये मलिदा मिळवण्यासाठीच हा सगळा खटाटोप केलेला दिसतो. अशा प्रकारे शेतीचे वारंवार नुकसान होत असेल तर प्रशासनाने गंभीर विचार केला पाहिजे  - अजित पोवार, माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी

Web Title: Kolhapur Direct pipeline burst for the third time in Radhanagari taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.