कोल्हापूर : महापालिका आयुक्तांच्या दारात दिवाळीदिवशी फटाके फोडू : देवदत्त माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:27 PM2018-10-29T12:27:31+5:302018-10-29T12:29:30+5:30
दिव्यांगांचा निधी महापालिका आयुक्तांनी टक्केवारीसाठी के.एम.टी. व लिफ्टसाठी वळविल्याचा निषेध करीत, हा निधी पूर्ववत दिव्यांगांना द्यावा; अन्यथा ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या दारात फटाके फोडून आंदोलन करू, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी येथे दिला.
कोल्हापूर : दिव्यांगांचा निधी महापालिका आयुक्तांनी टक्केवारीसाठी के.एम.टी. व लिफ्टसाठी वळविल्याचा निषेध करीत, हा निधी पूर्ववत दिव्यांगांना द्यावा; अन्यथा ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या दारात फटाके फोडून आंदोलन करू, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी येथे दिला.
टाउन हॉल येथील विरंगुळा केंद्र येथे आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
देवदत्त माने म्हणाले, दिव्यांगांसाठी राखीव असणारा अपंग कल्याण निधी महापालिका आयुक्तांनी मनमानी पद्धतीने के.एम.टी. व शिवाजी मार्केट येथील लिफ्टसाठी वळविला आहे. दरवर्षी जवळपास चार कोेटी निधी मंजूर होतो; परंतु गेल्या चार वर्षांपासून या निधीतील पैसे दिव्यांगांसाठीच खर्च झालेले नाहीत. त्यांच्या हक्काचा हा निधी त्यांना न विचारता परस्पर अन्यत्र वळविल्याबद्दल आयुक्तांचा निषेध आहे.
अशा पद्धतीने निधी इतरत्र वळविणे हा शासनाच्या निर्णयाप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या घरासमोर फटाके फोडून आंदोलन केले जाईल. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष विकास चौगुले, विष्णुपंत पाटील, अक्षय म्हेत्तर यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.