कोल्हापूर : धामणी, उचंगी प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीन वाटप करा: विभागीय आयुक्त, सिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:05 PM2018-01-06T16:05:10+5:302018-01-06T16:09:22+5:30
कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.
कोल्हापूर : जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ, नागनवाडी, धामणी आदी प्रकल्पांच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी विषयांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख उपस्थिती कृषी खोरे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शिल्पा राजे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनिषा कुंभार, गडहिंग्लज प्रांताधिकारी संगीता चौगुले, आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे आदींची होती.
चंद्रकांत दळवी म्हणाले, शासनाकडे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध असून पुढील दोन वर्षांत केंद्र सरकारकडूनही पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे.
छोट्या-छोट्या कारणांमुळे प्रकल्प अनेक काळ रखडणे, भूसंपादनाची कामे पूर्ण न होणे याबाबी विकासावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर दरमहा नियमितपणे बैठका घेऊन प्रकल्पांमधील अडचणींची पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने सोडवणूक करावी.
सर्फनाल्याचे ७५ टक्के काम पूर्ण
आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २२९ प्रकल्पग्रस्त असून त्यांना २०८ हेक्टर क्षेत्र देय आहे. यातील माहे डिसेंबर २०१७ अखेर ११५ प्रकल्पग्रस्तांना ९२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सध्या ७७ हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. अद्यापही ४० हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले
उचंगीचे ८५ टक्के काम
आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे २८० प्रकल्पग्रस्त असून १६१ प्रकल्पग्रस्तांना १०० हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर अखेर १०२ प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ५९ प्रकल्पग्रस्तांना ४२ हेक्टर जमीन देय आहे.
आंबेओहळचे ७० टक्के काम पूर्ण
आजरा तालुक्यातील आंबेओहळ मध्यम प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. याचे ८२२ प्रकल्पग्रस्त असून ४६७ जमीन मिळण्यास पात्र आहे. त्यांना ३२७ हेक्टर क्षेत्र देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर १३३ पात्र प्रकल्पग्रस्तांना ७२ हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ३३४ प्रकल्पग्रस्तांना २४८ हेक्टर क्षेत्र देय आहे.
नागनवाडीसाठी २२ हेक्टर जमिनींचे वाटप
भुदरगड तालुक्यातील नागनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २१४ प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर ६६ प्रकल्पग्रस्तांना २२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १४८ प्रकल्पग्रस्तांना ७९ हेक्टर क्षेत्र देय आहे.
धामणीचे ७५ टक्के काम पूर्ण
राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२३ प्रकल्पग्रस्तांना १२० हेक्टर जमीन देय आहे. डिसेंबर २०१७ अखेर ८० प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टरचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ४३ प्रकल्पग्रस्तांना ५६ हेक्टर क्षेत्र देय आहे.