कोल्हापूर : ग्रामविकासातील शिलेदारांना ‘लोकमत’ने दिले बळ, शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस्’चेवितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:02 PM2018-01-03T18:02:48+5:302018-01-03T18:15:23+5:30
ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी झालेल्या शानदान समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतीभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासावरील एक प्रकारचे विचारमंथनच ठरले.
कोल्हापूर : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी झालेल्या शानदान समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अॅवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतीभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासावरील एक प्रकारचे विचारमंथनच ठरले.
गावा-गावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्याना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक होते.
काँग्रेसचे नेते व माजी ग्रामविकास राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, निवड समितीमधील प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतआप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पहिल्याच वर्षी पुरस्कारासाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे २५० हून अधिक सरपंचांनी आपले प्रस्ताव सादर केले. प्रारंभी दीपप्रजवलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विशाल पाटील नृत्य अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या शेतकरी नृत्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. म्हणून ‘लोकमत’ने या उपक्रमाची सुरूवातही सातारा जिल्ह्यातून केली. सत्ता सर्वसामान्यांच्या हातात गेल्याने तिची फळे याच सामान्यांना चाखायला मिळतील अशी स्व. चव्हाण यांची भूमिका होती. नागरी वस्त्यांमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा या गावागावात उपलब्ध होण्याची गरज आहे.
यावेळी बीकेटी टायर्सचे असि. मॅनेजर महाराष्ट्र सेल्स जुबेर शेख, एरिया मॅनेजर (टेक्निकल सर्व्हिस अॅन्ड सपोर्ट) नेत्रानंद अंबाडेकर, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे पुणे एरिया मॅनेजर सत्यव्रत देशपांडे, चॅनेल केअर मॅनेजर आनंद दुलारिया, टेरिटरी मॅनेजर नितीशकुमार गावंदार, लकी अॅटो कोल्हापूरच्या वसुंधरा राजेंद्र बडे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींना कॉप्युटर आणि प्रिंटर
यावेळी विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी आपण जिल्ह्याचे आमदार असल्याचे सांगत या १३ पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना कॉम्प्युटर आणि प्रिंटर देण्याची घोषणा केली. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘लोकमत’मधील वृत्ताची चर्चा
‘सरपंच मानधन वाढीची अंमलबजावणी कागदावरच’ हे वृत्त बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत सर्वच वक्त्यांनी या वृत्ताचा संदर्भ घेऊन यासंदर्भात आता पाठपुरावा आवश्यक असल्याचे सांगितले.
‘लोकमत सरपंच अॅवॉडस्’विजेते
- जलव्यवस्थापन - सविता जालिंदर कांबळे, सांगरूळ ता. करवीर
- वीज व्यवस्थापन- बाळासो बाबगोंडा पाटील, किणी ता. हातकणंगले
- शैक्षणिक सुविधा- अनिल संभाजी पाटील, मुदाळ ता. भुदरगड
- स्वच्छता- हर्षदा राजाराम खोराटे, उत्तूर,ता. आजरा
- पायाभूत सुविधा - वैशाली शिवाजी पाटील, नेसरी. ता. गडहिंग्लज
- ग्रामरक्षा- छाया पांडुरंग संकपाळ, भादवण ता. आजरा
- आरोग्य- दिग्विजयसिंग किसन कुराडे ऐनापूर ता.गडहिंग्लज
- कृषि, तंत्रज्ञान - सुरेखा उदय गवळी, गडमुडशिंगी ता.करवीर
- प्रशासन/ई प्रशासन- जस्मिन लियाकत गोलंदाज, शिरोली पुलाची ता. हातकणंगले
- पर्यावरण- कांचन संजय चोपडे, लाटवडे ता. हातकणंगले
- रोजगारनिर्मिती- विद्या बाळासो संकेश्वरी नांदणी, ता.शिरोळ
- उदयोन्मुख नेतृत्व- शिवाजी बाजीराव पाटील, गोरंबे ता. कागल
- सरपंच आॅफ द इयर- सुवर्णा प्रकाश कोळी, शिरोळ ता. शिरोळ