कोल्हापूर जिल्ह्यात नवे १८२ कोरोना रुग्ण, पाच मृत्यू, संख्या पोहचली २७०७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 06:06 PM2020-07-21T18:06:28+5:302020-07-21T18:08:59+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी पुन्हा उद्रेक झाला, दिवसभरात तब्बल पाच कोरोनाग्रस्तांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात एकूण ६५ बळी ठरले.
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी पुन्हा उद्रेक झाला, दिवसभरात तब्बल पाच कोरोनाग्रस्तांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात एकूण ६५ बळी ठरले. सायंकाळपर्यत सुमारे नव्या १८२ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही २७०७ वर पोहचली आहे. कोरोनाग्रस्तांची दिवसेदिवस झपाट्याने वाढती संख्या ही प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येबरोबरच बळीची संख्याही आता झपाट्याने वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर शहरात मुक्तसैनिक वसाहतमध्ये तर इचलकरंजी शहरात गणेशनगरमध्ये प्रत्येकी एका वृध्दाचा मृत्यू झाला तर करवीर तालुक्यात उचगाव व शिये, हातकणंगले तालुक्यात हुपरी येथेही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे कोल्हापूर शहरात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या ८, इचलकरंजीमध्ये २४, हातकणंगले तालुक्यात ६ तर करवीर तालुक्यात ५ वर पोहचली आहे. सद्या उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १०८५ असून १५९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर शहरात ५० हून अधिक नवे रुग्ण वाढले तर इचलकरंजी शहरासह करवीर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे उद्रेक सुरुच राहीला. पन्हाळा, हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.
करवीर तालुक्यातील गांधीनगर, शिये, शिंगणापूर, तर पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तसेच हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रांगोळी आदी गावांत कोरोना रुग्णांचा समुह संसर्ग झाल्याने तेथे झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे.