कोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, सातजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 06:32 PM2020-08-29T18:32:37+5:302020-08-29T18:34:40+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या २४ तासांत ७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर सात रुग्णांचा मृत्यू झाला; त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ५०६ वर जाऊन पोहोचली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथे रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या २४ तासांत ७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर सात रुग्णांचा मृत्यू झाला; त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ५०६ वर जाऊन पोहोचली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथे रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रोज मोठ्या संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. विशेषत: कोल्हापूर व इचलकरंजी या दोन प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील हातकणंगले, करवीर, शिरोळ, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.
कोल्हापूर शहरात ६८२१, तर इचलकरंजी शहरात २७९७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरणाऱ्यांची संख्याही ६६१ वर जाऊन पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्के, तर मृत्यू होण्याचा दर तीन टक्के आहे.
शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथील रुग्णांवर केल्या जात असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.
फडणवीस यांनी पाऊण तासाच्या भेटीत कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णाशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून उपचाराची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या आवारातच उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जुन्या अपघात विभागातही जाऊन पाहणी केली. डॉ. म्हस्के यांनी त्यांना रुग्णालयाची सर्व माहिती दिली.