कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ८४ टक्के मतदान, कागल तालुक्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:16 AM2021-01-16T11:16:12+5:302021-01-16T11:18:12+5:30
gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने, चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड पहावयास मिळाली. त्यातून अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली असून, काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता.
कोल्हापूर : जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने, चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड पहावयास मिळाली. त्यातून अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली असून, काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता.
सर्वाधिक ९० टक्के मतदान कागल तालुक्यात झाले, तर शाहूवाडी तालुक्यातील पेरीडमध्ये बिनविरोधाची परंपरा खंडित होते म्हणून उमेदवारांसह मतदारांनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने एकही मतदान झाले नाही.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. माघारीनंतर ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. स्थानिक गटातटाची प्रतिष्ठा पणाला लागल्याने अनेक गावांत तणावपूर्ण मतदान प्रक्रिया झाली. त्यामुळे सकाळी ७.३०पासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. सकाळी लवकर मतदान करून शेतीच्या कामाला जायचे म्हणून मतदार लवकर घराबाहेर पडला होता. त्यामुळे सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०९ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३०पर्यंत ३६.१२ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाची गती वाढत जाऊन दुपारी दीडपर्यंत ५७.७० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३०पर्यंत तब्बल ७३.२२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३०पर्यंत ८३.८० टक्के मतदान झाले.
चिन्हांप्रमाणे वस्तूंचे वाटप
निवडणूक चिन्ह असलेल्या वस्तूंचे वाटप अनेक गावांत झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये छत्री, कप-बशी, शिट्ट्यांचे वाटप झाले, तर काही उमेदवारांनी संक्रांतीच्या सणासाठी आवश्यक आटा, गूळ, डाळ, आदी साहित्य घरपोच करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
चौकट
तालुकानिहाय मतदान
तालुका एकूण झालेले मतदान टक्के
शाहूवाडी ३४०१९ ७४.४६
पन्हाळा ७५१६१ ८२.२७
हातकणंगले ८२६०५ ८२.५१
शिरोळ १२३०६६ ८३.७२
करवीर ११२५७४ ८८.२३
गगनबावडा ७६०६ ८५.५१
राधानगरी १८७०२ ७६.९८
कागल ९९९५४ ९०.०९
भुदरगड ३६७७२ ८३.५९
आजरा २३०४७ ८२
गडहिंग्लज ६५२५० ८०.११
चंदगड ४०५५० ८२.९४
एकूण ७१९३०६ ८३.८०