कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोधच्या आडून दोन्ही काँग्रेसची निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 01:06 PM2021-12-02T13:06:29+5:302021-12-02T13:08:36+5:30
गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे.
राजाराम लाेंढे
कोल्हापूर : जिल्हा बँकेचीनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख नेतेमंडळी रोज जप करत असले तरी त्या आडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी इच्छुकांना सर्वच गटातून अर्ज दाखल करण्याच्या सूचना देत सावध भूमिका घेतली आहे.
जिल्हा बँकेची प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत फारशी चुरस दिसली नव्हती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेत बहुतांशी जागा बिनविरोध केल्या होत्या. याला बँकेची आर्थिक परिस्थितीही कारणीभूत असू शकते. बँक १०० कोटींपेक्षा अधिक संचित तोट्यात होती, तिला बाहेर काढण्याची जोखीम संचालक मंडळावर होती. त्यातही बरखास्त संचालक मंडळातील प्रत्येकावर सव्वापाच कोटींची जबाबदारी निश्चित झाली होती. त्यामुळे एक-दोन जागा वगळता इतर ठिकाणी बिनविरोध अथवा एकतर्फीच निवडणूक झाली होती. गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे.
बारा तालुक्यातील विकास संस्थांच्या दोन-तीन जागा बिनविरोध होऊ शकतात. उर्वरित ठिकाणी जोरदार संघर्ष होणार आहे. त्याशिवाय इतर गटातील नऊ जागांवरही लढाई निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुखांनी बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी त्यात यश मिळणार नाही, हे त्यांनाही माहिती आहे. ‘प्रक्रिया’, ‘पतसंस्था’, ‘दूध संस्था’, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व महिला गटातील जागांवर चुरस आहे. ‘प्रक्रिया’ व पतसंस्था गटातून अर्ज दाखल करत एका जागेवर आमदार प्रकाश आवाडे यांनी दावा केला आहे. पतसंस्था गटातून प्राचार्य अर्जुन आबीटकर, जनार्दन टोपले यांनीही जोरदार तयारी केली आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सुरूडकर, माजी खासदार राजू शेट्टी यांना नऊपैकी कोणतीही एक जागा हवी आहे. कॉंग्रेस राखीव पाचपैकी चार जागा सोडण्यास तयार नाही, असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू असले तरी लढाई करावी लागणार हे गृहीत धरूनच दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी तयारी ठेवली आहे. मंगळवारी प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सर्वच गटात अर्ज दाखल करून ठेवण्याचे फर्मान आपल्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार कॉंग्रेसनेही तयारी सुरू केली आहे.
अडवणुकीसाठी व्यूहरचना
राजकारणात एखादी गोष्ट सहजासहजी पदरात पडत नसेल तर सर्व प्रकारची अस्त्रे बाहेर काढली जातात. त्याचाच प्रत्यय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत येत आहे. दोन-तीन गटात अर्ज दाखल करून अडवणुकीची व्यूहरचना आखली आहे.