कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे, निकालापेक्षा याचीच सर्वत्र चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 10:25 AM2022-01-07T10:25:58+5:302022-01-07T10:57:18+5:30
मतदारांनी उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा ह्याच प्रकाराची मतदान केंद्रावर चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. मात्र निकाल लागण्या आधीच अजब प्रकार समोर आला आहे. मतपेटीत मतदाना ऐवजी मतदारांना चिठ्या आणि पैसे सापडले आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा ह्याच प्रकाराची मतदान केंद्रावर चर्चा रंगली आहे.
‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा… आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.
‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मतमोजणीवेळी सापडले.
आतापर्यत हाती आलेल्या निकालानुसार विकास सेवा संस्थातून पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना ९८ मते मिळाली. विरोधी गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. तर, पन्हाळा गटातून आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत. शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड. आजरा गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, गडहिंग्लज संतोष पाटील विजयी झाले आहेत.