kdcc bank election : ‘सतेज’, ‘मुश्रीफ’ ‘ए. वाय.’ना बिनविरोधची संधी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:57 AM2021-11-30T11:57:20+5:302021-11-30T11:58:04+5:30

जिल्हा बँकेच्या बारा तालुक्यांतील विकास संस्था गटात मातब्बर रिंगणात राहणार आहेत. ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘पन्हाळा’ वगळता इतर ठिकाणी मात्र काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.

In Kolhapur District Bank election Satej Patil, Hasan Mushrif and A. Y. Patil is likely to be unopposed | kdcc bank election : ‘सतेज’, ‘मुश्रीफ’ ‘ए. वाय.’ना बिनविरोधची संधी अधिक

kdcc bank election : ‘सतेज’, ‘मुश्रीफ’ ‘ए. वाय.’ना बिनविरोधची संधी अधिक

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : विधानपरिषदेपाठोपाठ जिल्हा बँकेसाठीही गगनबावडा विकास संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील, तर ‘शाहू’ कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ‘राधानगरी’तून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘पन्हाळा’ वगळता इतर ठिकाणी मात्र काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.

जिल्हा बँकेच्या बारा तालुक्यांतील विकास संस्था गटात मातब्बर रिंगणात राहणार आहेत. कमी मतदान असल्याने टोकाचा संघर्ष पाहावयास मिळतो. पालकमंत्री सतेज पाटील हे गगनबावडा विकास संस्था गटातून इच्छुक असून, त्यांनी गेली पाच वर्षे जोरदार तयारी केल्याने ठरावांची गोळाबेरीज पाहता, त्यांचा सहज विजयी होऊ शकतो. त्यांचे प्रतिस्पर्धी पी. जी. शिंदे यांनी मातब्बरांशी लढत देत तालुक्यात आपले अस्तित्व टिकवले आहे, त्यांचे पुनर्वसन कसे करायचे? असा पेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आहे. शिंदे यांच्या पत्नींना महिला गटातून उमेदवारी देऊन ‘सतेज’ यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो, तसा प्रयत्न सुरू आहे.

राधानगरीतून ए. वाय. पाटील यांच्या विरोधात मध्यंतरी ‘भोगावती’चे संचालक विश्वनाथ पाटील यांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरी आमदार पी. एन. पाटील यांची संमती नसल्याने त्यांचे बंड काहीसे थांबल्याचे दिसते. परिणामी ‘ए. वाय.’ यांचा बिनविरोधचा मार्ग खुला होऊ शकतो. कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे आहेत. मात्र ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे विकास संस्था गटातून उमेदवार देणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘शाहू’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांना बिनविरोधसाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.

बँकेच्या गेल्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, विनय काेरे हे बिनविरोध झाले होते. ‘करवीर’मध्ये पाटील यांच्या विरोधात चंद्रदीप नरके गटाचा, तर पन्हाळ्यातून विनय कोरे यांच्या विरोधात सत्यजित पाटील-सरुडकर गटाचा उमेदवार असू शकतो. इतर गटातून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांनी लढण्याची तयारी केली आहे. हातकणंगले विकास संस्था गटात महाडिक यांचे वर्चस्व असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, मात्र येथे राष्ट्रवादीचे शिरीष देसाई (पट्टणकोडोली) यांनी प्रचार सुरू केला आहे. देसाई यांची भूमिका मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्यावरच अवलंबून आहे. ‘शिरोळ’, ‘चंदगड’, ‘आजरा’, ‘भुदरगड’, ‘शाहूवाडी’, ‘गडहिंग्लज’ येथे काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे.

‘सातारा’ बँकेच्या अनुभवातून सावध

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना झटका दिला. तिथे गाफीलपणा अनेकांना नडल्याने त्या अनुभवातून येथील इच्छुक चांगलेच सावध झाले आहेत. त्यांनीही मतदार सोबत असले तरी दगाफटका होऊ नये, यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

शिवसेनेत अस्वस्थता...

जिल्हा बँकेच्या समझोत्याच्या राजकारणात शिवसेनेकडून प्रक्रिया गटातून संजय मंडलिक, तर महिला गटातून निवेदिता माने यांना संधी मिळणार आहे. मात्र, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर यांची समजूत काढण्याची जबाबदारी खासदार मंडलिक यांच्यावर सोपवली असली तरी आबिटकर व नरके हे थांबण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत.

कारंडेसाठी राजू शेट्टी आग्रही

जिल्हा बँकेत भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून स्वाभिमानीचे हातकणंगले येथील कार्यकर्ते संदीप कारंडे यांच्यासाठी राजू शेट्टी आग्रही आहेत. त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत

Web Title: In Kolhapur District Bank election Satej Patil, Hasan Mushrif and A. Y. Patil is likely to be unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.