कोल्हापूर जिल्हा बॅँकेकडून ‘त्या’ घटनेची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:33 AM2019-06-13T11:33:27+5:302019-06-13T11:35:44+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बीड शाखेंतर्गत वाटप केलेल्या किसान क्रेडिट कार्डचा गैरवापर करून, परस्पर पैसे हडप केल्याचे स्पष्ट झाले. सावरवाडी (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने बॅँकेकडे तक्रार दिली असून, त्याची चौकशी बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वाटपात दोषी कोण आहेत, याचा शोधही घेतला जात आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बीड शाखेंतर्गत वाटप केलेल्या किसान क्रेडिट कार्डचा गैरवापर करून, परस्पर पैसे हडप केल्याचे स्पष्ट झाले. सावरवाडी (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने बॅँकेकडे तक्रार दिली असून, त्याची चौकशी बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वाटपात दोषी कोण आहेत, याचा शोधही घेतला जात आहे.
जिल्हा बॅँकेने २०१६ पासून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बॅँकेतून व्यवहार करावा, हा उद्देश होता. बॅँकेच्या शाखांच्या माध्यमातून या कार्डचे वाटप करण्यात आले.
कसबा बीड शाखेतून त्या परिसरातील शेतकऱ्यांना कार्ड वाटप केले होते; पण शुक्रवारी (दि. ७) सावरवाडी येथील एका शेतकºयाच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शाखेशी संपर्क साधल्यानंतर ए. टी. एम. कार्डद्वारे पैशाची उचल केल्याचे दिसले.
हळदी (ता. करवीर) येथील एका बॅँकेच्या ए. टी. एम.मधून हे पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्तीने २२ हजार रुपये काढले. जिल्हा बॅँकेने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. हळदी येथील एका राष्ट्रीयकृत व एका खासगी बॅँकेच्या ए. टी. एम. सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी जिल्हा बॅँकेने केली आहे.
बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हे फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते. फुटेजवरून ती व्यक्ती कोण? याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेलेच कसे? यामध्ये दोषी कोण? याची सखोल चौकशीही बॅँकेच्या पातळीवरून सुरू आहे.
दोन बॅँकांच्या एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्यातून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. लवकरच या प्रकाराचा छडा लावला जाईल.
- डॉ. ए. बी. माने,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक