कोल्हापूर जिल्हा बँक आता जाणार व्यापारी, उद्योजकांच्या दारात, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 02:25 PM2024-06-01T14:25:55+5:302024-06-01T14:26:10+5:30
ग्राहकांना क्यूआर कोड स्टँडीसह साउंड बॉक्स सुविधा देण्याची मोहीम
कोल्हापूर : जिल्हा बँक छोटे, मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजकांच्या दारात जाणार असून बँकेच्या वतीने क्यूआर कोड स्टँडीसह साऊंड बॉक्स सुविधा पुरवण्याची मोहीम हातात घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. येत्या दोन महिन्यात एक लाख ग्राहकांपर्यंत क्यूआर कोड पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्राहकांना बँकेच्या वतीने विमा सुविधा देण्याचा बँकेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ग्राहकांना अत्याधुनिक सुविधांमुळे वेळ व प्रवासाची बचत होऊन घरबसल्या सुविधा मिळणार आहेत. या योजनेचा प्रचार व प्रसार कोल्हापूर शहरासह तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. तालुक्याची गावे, मोठ्या बाजारपेठा, मोठी गावे व इतर ठिकाणचे व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांकडे जाण्यासाठी बँकेने ही मोहीम हाती घेतली आहे. कामाच्या व्यापातून त्यांना रोज बँकेत येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी क्यूआर कोडसह साउंड बॉक्स सुविधा पुरविण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजू आवळे यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित हाेते.
विनाशुल्क जोडणी.!
ग्राहकांना ही सुविधा विनाशुल्क जोडणावळ करून दिली जाणार आहे. क्यूआर कोडच्या व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकाला बँकेकडे त्याच्या इच्छेनुसार दैनंदिन संचयनी म्हणजेच पिग्मी खात्यामध्ये इच्छेनुसार रक्कम ठेवता येणार आहे. पिग्मीवर ग्राहकांना अत्यल्प व्याजदराचे कर्जही दिले जाणार आहे.
‘पी. एन.’ यांची खुर्ची रिकामी राहील.!
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी गेली ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून उत्कृष्ट काम केले. सभागृहातील ईशान्येकडील कोपऱ्यातील खुर्चीत बसून ते शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच हिरीरीने मांडायचे. आज ती खुर्ची रिकामीच पडल्याचे सांगताना मंत्री मुश्रीफ भावुक झाले.