kdcc bank result : मुश्रीफ-सतेज पाटील-कोरे आघाडीचीच पुन्हा सत्ता, शिवसेनेची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 09:54 AM2022-01-07T09:54:34+5:302022-01-08T11:19:18+5:30
बँकेवरील सत्ता कायम राखण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे हे यशस्वी झाले.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीची सरशी झाली. बँकेवरील सत्ता कायम राखण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे हे यशस्वी झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीस १७, तर विरोधी शिवसेना आघाडीस ४ जागा मिळाल्या.
शिवसेनेनेही जोरदार मुसंडी मारली असून, चार जागा जिंकल्या आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचा पतसंस्था गटातून धक्कादायक पराभव झाला. भाजपचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाला आहे. या निवडणुकीत भाजप सत्तारूढ आघाडीत, तर विरोधात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनल होते. मंडलिक प्रक्रिया गटातून विजयी झाले.
बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांचे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होते. शिवसेनेने तीन जागा मागितल्या होत्या. त्यांना दोन जागा देण्याची मुश्रीफ यांची तयारी होती. आमदार कोरे यांनी राजकीय विरोधक असलेल्या बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना पॅनलमध्ये घ्यायचे नाही, असा आग्रह धरला. त्यातून वाटाघाटी फिसकटल्या व मंडलिक यांनी बाहेर पडून परिवर्तन पॅनल निर्माण केला.
मंडलिक यांना सत्तापरिवर्तन करता आले नाही, परंतु त्यांनी चांगली लढत दिली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेेचे उमेदवार अर्जुन आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा पतसंस्था गटातून मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी खासदार निवेदिता माने, काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांचे बंधू अर्जुन आबीटकर हे प्रमुख उमेदवार विजयी झाले. मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
यड्रावकर यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना रिंगणात उतरवले होते; परंतु तिथे पाटील यांचा पराभव झाला. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ शेट्टी यांच्या गटाचा हा तिसरा पराभव आहे.
या निवडणुकीत २१ जागांपैकी विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्याने १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. एकूण ७६५१ मतदार होते. ५ तारखेला चुरशीने ९८ टक्के मतदान झाले होते.
सात नव्या चेहऱ्यांना संधी
या निवडणुकीत अर्जुन आबीटकर, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, रणवीर गायकवाड, सुधीर देसाई, अमल महाडिक, विजयसिंह माने या नव्या चेहऱ्यांना बँकेच्या सत्तेत प्रथमच संधी मिळाली. त्यातील रणवीर गायकवाड हे काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू आहेत.
श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, सुधीर देसाई व विजयसिंह माने यांच्या रूपाने कार्यकर्त्यांना संधी मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार यांचा मात्र पराभव झाला.
सात आमदार..एक खासदार
जिल्हा बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकीय व आर्थिक सत्तेची नाडी समजली जाते. त्यामुळे या बँकेची सत्ता आपल्याकडेच राहिली पाहिजे यासाठी मातब्बर नेत्यांनी ताकद पणाला लावली. संचालक मंडळात मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर या मंत्र्यांसह आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, विनय कोरे, राजेश पाटील आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे. खासदार संजय मंडलिक यांच्यासह माजी खासदार निवेदिता माने यादेखील निवडून आल्या आहेत.