kdcc bank result : पॅनेलमध्ये नको असणारेच झाले संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 12:54 PM2022-01-07T12:54:14+5:302022-01-07T12:55:19+5:30
ज्यांच्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न संपले आणि निवडणूक लागली, जे पॅनेलमध्येही नको होते तेच संचालक म्हणून आले निवडून.
कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निकाल हाती लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात अनेक दिग्गजांचा करेट कार्यक्रम झाला आहे. नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे, शाहूवाडीतुन संस्था गटातून बँकेचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर, तर गडहिंग्लज तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांचा प्रभाव झाला आहे.
ज्यांच्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न संपले आणि निवडणूक लागली, जे पॅनेलमध्येही नको होते तेच संचालक म्हणून निवडून आल्याची गंमतीशीर आणि तितकीच आत्मचिंतन करणारी घटना घडली आहे. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे मुश्रीफ यांना सत्तारुढ पॅनेलमध्ये हवे होते, पण आमदार विनय कोरे यांच्या प्रखर विरोधामुळे त्यांना पॅनेलमधून बाहेर पडावे लागले. पॅनेल जाहीर झाल्याच्या दिवशीच आसुर्लेकर यांनी विरोधी शिवसेना पॅनेलमध्ये प्रवेश केला आणि इर्ष्येने निवडणूक जिंकून झालेल्या अपमानाचे उट्टे देखील काढले.
अर्जून आबीटकर यांच्यासाठी प्रकाश आबीटकर यांचा आग्रह होता. पण के.पी.पाटील यांचा विरोध असल्याने मुश्रीफ यांनी आबीटकर यांच्या उमेदवारीसाठी विरोध केला. पण शेवटच्या दोन दिवसात मोठ्या जोडण्या लावत अर्जून आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा दारुण पराभव केला. या दोन्ही विजयामुळे पॅनेलमध्ये नेत्यांनी विरोध केलेल्यांनाच मतदारांनी बॅंकेत आणून बसवले.