Kdcc Bank Election : पॅनल रचनेत विधानसभेची बांधणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 12:21 PM2021-12-23T12:21:02+5:302021-12-23T12:22:26+5:30

बँकेच्या निवडणुकीसह भविष्यातील राजकारणात कोण आपल्याला डोकेदुखी ठरेल याचा विचार करून विरोध झाल्याचे व सांभाळून घेतल्याचे चित्र अनेक तालुक्यात दिसत आहे.

Kolhapur District Central Co-operative Bank is preparing for the Assembly elections | Kdcc Bank Election : पॅनल रचनेत विधानसभेची बांधणी 

Kdcc Bank Election : पॅनल रचनेत विधानसभेची बांधणी 

googlenewsNext

विश्वास पाटील 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे कंगोरे असल्यानेच ही निवडणूक बिनविरोध होण्यात अडचणी आल्या. बँकेच्या निवडणुकीसह भविष्यातील राजकारणात कोण आपल्याला डोकेदुखी ठरेल याचा विचार करून विरोध झाल्याचे व सांभाळून घेतल्याचे चित्र अनेक तालुक्यात दिसत आहे.

बँकेच्या निवडणुकीचा विधानसभेसाठी सर्वाधिक वापर आमदार विनय कोरे यांनी करून घेतला आहे. त्यांनी शाहूवाडी व वडगाव विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही जागा निवडून आणून त्या बळावर त्यांना मंत्री व्हायचे आहे. असा प्रयोग त्यांनी २००४ च्या निवडणुकीतही केला आहे. चार आमदार निवडून आणल्यावर त्यांनी राज्यातील काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला व त्यातून अपारंपरिक ऊर्जा मंत्रीपद मिळवले होते. 

२०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर ते व्यक्तिगत राजकारणात व समूहाच्या पातळीवरही मागे पडले होते पण त्यांनी पुढच्या पाच वर्षांत ज्या जोडण्या लावल्या त्यामध्ये विधानसभा जिंकली, भाजपच्या मदतीने वारणा कारखान्याचे अर्थकारण मार्गी लावले. गोकुळच्या निवडणुकीत अमर पाटील व कर्णसिंह गायकवाड यांना संधी देऊन दोन्ही तालुक्यांत किमान ३० हजार मतांची जोडणी लावली. आता ते स्वत: पन्हाळा विकास संस्था गटातून उमेदवार आहेत. 

शाहूवाडीतून त्यांचे खंदे समर्थक सर्जेराव पाटील पेरिडकर रिंगणात आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना संधी देतानाच त्यांनी जे पन्हाळा तालुक्यात राजकीय विरोध करतात त्या बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी राजकीय ताकद वापरली. इतर मागासवर्ग गटातून विजयसिंह माने यांना उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झाले. एकाचवेळी त्यांनी भाजप आणि दोन्ही काँग्रेसलाही खेळवले आहे. 

वडगाव विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे व माजी खासदार राजू शेट्टी यांचा हात हातात घेतला आहे. महाडिक यांनी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या विरोधात एकदा पॅनेल केल्याचा राग म्हणून ते कधीच महाडिक यांच्याजवळ गेले नाहीत; परंतु तो राजकीय विरोधही त्यांनी मागे टाकला आहे.

कारण वडगांवमध्ये कोरे-महाडिक-आवाडे व शेट्टी एकत्र आले तर विजयापर्यंत जाऊ असे त्यांचे आताचे गणित आहे. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत जनसुराज्यच्या अशोकराव माने यांना ४४५६२ मते पडली आहेत. विजयातील अंतर ३० हजार मतांचे आहे.

राधानगरीत एकमेकांना रोखण्याचे प्रयत्न...

- बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यात दोन प्रमुख अडचणी आल्या त्या कुणाला संधी द्या यापेक्षा कुणाला पॅनलमध्ये घ्यायचे नाही यावरून. त्यात कोरे यांनी आसुर्लेकर यांना विरोध केला. पतसंस्था गटातून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांना राष्ट्रवादीचे नेते के. पी. पाटील यांनी विरोध केला. 

- ‘गोकुळ’मध्ये त्यांना दोन जागा दिल्या. आम्ही विरोध केला नाही, परंतु आता पुन्हा बँकेला आमच्या डोक्यावर त्यांना बसवणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत नाही, असाच पवित्रा के. पी. पाटील यांनी घेतल्याने आबिटकर यांना संधी मिळाली नाही. 

- या गटातून भाजपला जवळ घ्यायचे म्हणून सत्तारूढ गटाने आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली. पाहुण्याच्या काठीने साप मारण्यातला हा प्रकार आहे. राधानगरी विकास संस्था गटातून ए. वाय. पाटील हे बिनविरोध विजयी होणे हे त्यांची विधानसभेची दावेदारी अधिक भक्कम करणार आहे.

शिरोळला लोकसभेपर्यंतचे धागेदोरे

शिरोळ विकास संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील अशी लढत होत आहे. यामागेही विधानसभा व लोकसभेचे राजकारण आहे. बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गणपतराव पाटील यांच्या रुपाने यड्रावकर यांचा हक्काचा पाठीराखा त्यांच्यापासून बाजूला करण्यात माजी खासदार राजू शेट्टी यांना यश आले. त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीही त्यांना याचा फायदा होऊ शकतो, असाही जातीय पदर त्यामागे आहे.

मंडलिक यांचे गणित...

मंडलिक यांची जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिमा ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या शब्दाबाहेर नाहीत, अशी झाली होती. त्यांनी या निवडणुकीत पक्षाबरोबर राहून शिवसेनेच्या गुडबुकमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्यांची जशी मला गरज आहे, तशीच त्यांच्या राजकारणासाठी माझीही त्यांना नक्कीच मदत लागते, असाही अर्थ त्यामागे आहे. संचालकाच्या एका जागेसाठी त्यांनी शिवसेनेला फाट्यावर मारले, अशी पावती त्यांच्या नावावर फाटली असती, ते टाळून पदापेक्षा मला पक्षीय बांधिलकी जास्त महत्त्वाची आहे, हे किमान दाखविण्यात तरी ते नक्कीच यशस्वी झाले आहेत.

भरमू पाटील यांची मिठी...

आमदार पी. एन. पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील पक्ष मजबूत व्हावा, या हेतूनच शाहू काटकर यांच्या पत्नीला संधी दिली. पी. एन. यांच्या गटातून आलेल्या रवींद्र मडके यांना संधी देऊन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही तोच प्रयत्न केला आहे. चंदगडमध्ये माजी मंत्री भरमू पाटील यांच्या कार्यकर्त्याने माघार घेणे याचा अर्थ तालुक्याच्या राजकारणात आमदार राजेश पाटील - भरमू पाटील गट यापुढील राजकारणात एकत्र राहणार हाच आहे. भरमू पाटील यांनी आमदार पाटील यांना मारलेल्या मिठीमागे हेच राजकीय प्रेम आहे.

Web Title: Kolhapur District Central Co-operative Bank is preparing for the Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.