Kolhapur: 'केडीसीसी’ राज्यात नंबर वन आणू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
By राजाराम लोंढे | Published: March 4, 2024 01:39 PM2024-03-04T13:39:17+5:302024-03-04T13:39:46+5:30
१० हजार कोटी ठेवींचा इष्टांक
कोल्हापूर : मागील आर्थिक वर्षात ठेवी व नफ्याचे दिलेले उदिष्ट्य पार केले, या आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवीचा इष्टांक पुर्ण करायचा आहे. त्यादृ्ष्टीने कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) राज्यात नंबर वन आणू, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मार्च २०२४ च्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वृध्दी, ठेव इष्टांक व वसुली पुर्तता या कार्यशाळेत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, बँकेने ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही काही आवश्यक सुविधा असतील तर ग्राहकांसाठी त्याची पुर्तता केली जाईल.
व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक एस. ए. वरुटे, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. डी. आडनाईक, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. जे. पाटील, सीएमए सेलचे व्यवस्थापक अल्ताफ मुजावर यांनी विभागनिहाय आढावा सादर केला. लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
बँकेचे उपाध्यक्षआमदार राजू आवळे, राजेश पाटील, निवेदिता माने, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिह पाटील, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, विजयसिंह माने, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी आदी उपस्थित होते. लेखापरीक्षण विभागाचे व्यवस्थापक एस. व्ही. लाड यांनी आभार मानले.
राज्यात ‘केडीसीसी’च अव्वल
राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये ‘केडीसीसी’ बँकेचे स्थान फार वरचे आहे. प्रत्येक शाखा व्यवस्थापकाने ताळेबंद बांधताना आर्थिक निकषांची पुर्तता करावी, असे आवाहन राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक व जिल्हा बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.
एन. पी. ए. अजिबात नको..
मागील एनपीएची वसुली मार्च पुर्वी झाली पाहिजे, गेल्या वर्षीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होता कामा नये, त्यादृष्टीने वसुलीची प्रक्रिया राबवा, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या.