गोकुळ'कडून दूध उत्पादकांना गुढी पाडव्याची भेट, दूध खरेदी दरात केली 'इतकी' दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:33 PM2022-03-30T18:33:38+5:302022-03-31T11:09:20+5:30
संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदी दरामध्ये १ एप्रिल पासुन ही दरवाढ करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या दरवाढीची अंमलबजावणी उद्या, शुक्रवार पासून करण्यात येणार असून उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची भेट दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ साठीचा दर ४१ रुपये ५० पैशावरुन ४३ रुपये ५० पैसे तर गाय दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी २७ रुपयांवरुन २९ रुपयांपर्यंत दर दूध उत्पादकांना मिळणार आहे.
गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांच्या सहकाऱ्यामुळेच संघाने घोडदौड सुरू ठेवल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
दहा महिन्यात दुसरी दरवाढ
‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर गेल्या दहा महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा खरेदी दरात वाढ केली आहे. पहिल्यांदा म्हैस दूध खरेदी दरात दोन तर गाय दुधास एक रुपये वाढ केली होती. आता पुन्हा म्हैस व गाय दुधास प्रत्येकी दोन रुपयांची अशी गेल्या दहा महिन्यात अनुक्रमे चार व तीन रुपयांची वाढ केली.
विक्री दरवाढ तूर्त लांबणीवर
साधारणत: दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर विक्री दरातही वाढ केली जाते. राज्यातील इतर दूध संघांनी खरेदी व विक्री दरात वाढ केली, मात्र ‘गोकुळ’ ने सध्या केवळ खरेदी दरातच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे