लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 05:35 PM2019-08-06T17:35:51+5:302019-08-06T17:36:06+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल होत आहेत.
कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल होत आहेत. लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्ह्यात काल आणि आज पडलेल्या पावसामुळे तसेच धरण प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होऊ शकते याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला आणि आर्मी व नेव्हीला मदतीसाठी विनंती केली आहे. त्यानुसार एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले असून त्यांनी आंबेवाडी-चिखली येथील पूरग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य सुरू केले आहे. दुसरे पथक थोड्याच वेळात दाखल होणार असून आर्मीचे 80 जणांचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले असून मुंबईहून नेव्हीची यंत्रणाही विमानाने कोल्हापूरात येईल. या सर्वांची मदत घेऊन जिल्ह्यातील गंभीर बनत चालेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र लोकांनी घरात पाणी येण्याची वाट न बघता अगोदरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हासूर, कुटवाड, कनवाड, हासुर आदि गावांना पाण्याने वेढा दिला आहे. या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाने युध्द पातळीवर हाती घेतले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, याबरोबरच कोल्हापूर शहरातील सखल भागात पूराचे पाणी चढत आहे.
लोकांनी पाणी चढण्याअगोदरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, तसेच शहरातील पूराचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र लोकांनी पूरपरिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पाण्याचा वेढा दिलेल्या गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने हाती घेतले असून यासाठी स्थानिक यंत्रणांबरोबरच एनडीआरएफ,आर्मी व नेव्हीची मदत घेण्यात येत आहे. काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यतील 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
आज दिवसभरात शिये येथील 130 कुटुंबाचे, चिखली- आंबेवाडी येथील 300 कुटुंबाचे व गाडेगोंडवाडी येथील 90 कुटुंबाचे, परिते येथील 22 कुटुंबाचे, निढोरी येथील 82 कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे तर पाडळी बु. गावातील 100 टक्के स्थलांतर झाले आहे. तसेच आरे गावचे 75 टक्के स्थलांतर झाले आहे.
गगनबावडा तालुक्यातील 190 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून शहरातही अनेक ठिकाणी पूरग्रस्तांचे स्थलांतर केले आहे. पूराचे पाणी शिरलेल्या जिल्ह्याच्या अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
राजाराम बंधारा दुपारी 12 वाजताची पाणी पातळी 52 फूट 6 इंच होती. त्याबरोबरच राधानगरी धरणातून 17 हजार 400 क्युसेक, तुळशी धरणातून 4 हजार 947, चिकोत्रा धरणातून 2 हजार क्युसेक, दुधगंगा धरणातून 20 हजार 300, कोयना धरणातून 1 लाख 10 हजार 970 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे.
धरण प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी आणि सध्या सुरू असलेला पाऊस यामुळे नद्याच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तरी नदी पात्रालगतच्या लोकांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्हयातील जनतेने घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पूरग्रस्तांच्या व नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तराव नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1077 असा आहे. जनतेने टोल फ्री क्रमांकावर पूरपरिस्थितीबाबत अथवा मदतीची आवश्यकता असल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही दौलत देसाई यांनी केले आहे.