केरळ पुरातही झाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मोलाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 04:24 PM2019-08-14T16:24:18+5:302019-08-14T16:29:51+5:30
प्रवीण देसाई कोल्हापूर : गतवर्षी केरळमध्ये प्रलयकारी महापुरात मोलाची कामगिरी करून मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम तत्कालीन राज्य आपत्ती ...
प्रवीण देसाई
कोल्हापूर : गतवर्षी केरळमध्ये प्रलयकारी महापुरात मोलाची कामगिरी करून मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम तत्कालीन राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक व सध्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले होते. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वानुभवाचा उपयोग कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात झाला. शांत डोक्याने कोणतीही मनुष्यहानी न होता, जास्तीत जास्त लोकांना मदत कशी पोहोचेल, याचे केलेले नियोजन वाखाण्याजोगे आहे.
केरळ राज्यात गेल्यावर्षी प्रलयकारी महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. गलितगात्र झालेल्या तेथील राज्यशासनालाही काय करावे, हे सुचेना. यावेळी महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या तत्कालीन आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई यांनी मोलाचे सहकार्य करून धीर देण्याचे काम केले. त्यांनी मंत्रालयात बसून, तेथील परिस्थितीचा आढावा घेत, तेथील प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील योग्य मार्गदर्शन केले.
नुसते मार्गदर्शन करून ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रुपयांचे ४० हॉर्स पॉवरचे पाणी बाहेर काढणारे पंप दिले. त्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी साचले होते ते काढण्यामध्ये केरळ सरकारला मोठा हातभार लागला. तसेच इतरही जीवनावश्यक मदतही राज्य सरकारसह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संकलित करून ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. अशा कठीण परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करायचा हा अनुभव गाठीला असल्याने जिल्हाधिकारी देसाई यांनी कोल्हापुरातील महापुरातही मोलाची भूमिका बजावली.
कोल्हापूरने गेल्या १00 वर्षांत अनुभवला नाही, इतका मुसळधार पाऊस यावर्षी झाला. या महापुराने होत्याचे नव्हते झाले. शिरोळमधील १२ व करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी ही गावे पूर्णपणे पाण्यात गेली. कोणतीही मनुष्यहानी न होऊ देता, पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते.
यात जिल्हाधिकारी देसाई यांचा कस लागणार होता; परंतु त्यांनी ही परिस्थिती शांतपणे हाताळली. कोणतीही चिडचिड नाही किंवा अशा परिस्थितीत काय करायचे हा त्यांना पूर्वानुभव असल्याने त्यांनी योग्य नियोजन करून शांतपणे या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.