गुड न्यूज: कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडील यंत्रणा होतेय हायटेक
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 1, 2025 14:10 IST2025-01-01T14:10:01+5:302025-01-01T14:10:46+5:30
कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, पाटबंधारे विभागांचा समावेश

संग्रहित छाया
इंदुमती गणेश
कोल्हापूर : जिल्ह्याला वारंवार बसणारा महापुराचा फटका कमी व्हावा, किंबहुना तो बसूच नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील यंत्रणा हायटेक, डिजिटल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, तसेच पाटबंधारे या तीन कार्यालयांचादेखील यामध्ये समावेश केला जाणार आहे. या महिन्यात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख कोल्हापुरात येणार असून, त्यावेळी यावर शिक्कामोर्तब हाेणार आहे.
कोल्हापूरला गेल्या पाच वर्षांत तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे महापुरावर कायमचा उपाय शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३ हजार कोटींचा प्रकल्प पुढील तीन वर्षांत राबविण्यात येत आहे. त्यासाठी बँकेची टीम पाच ते सहा वेळा कोल्हापुरात येऊन गेली आहे. सध्या या टीमकडून प्रकल्पाचा अहवाल तयार केला जात आहे. तसेच प्रकल्प राबविण्यासाठी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची चाचपणी केली जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कार्यालये हायटेक करून त्यांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कार्यालय, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका व पाटबंधारे विभाग अशा एकूण चार कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे.
हायटेक म्हणजे नेमके काय होणार?
जीआयएस प्रणाली : महापुराचे एलइडी वॉलवर मॅपिंग, बाधित होणारा भाग, रस्ते यांचे मॅपिंग, त्याला पर्यायी रस्त्यांची माहिती. पाणी कोणत्या पातळीवर आले आहे याचे रिअल टाइम अपडेट, अतिवृष्टीचा इशारा, जीपीएस प्रणाली, बिनतारी संदेश यंत्रणा, पब्लिक ॲड्रेस सिस्टिमची कार्यक्षमता अधिक वाढवणे, सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा.
सध्या हे सगळे काम मॅन्युअली म्हणजेच शासकीय यंत्रणेकडून अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून केले जाते; पण हायटेक डिजिटल यंत्रणा आली ती अधिक बिनचूक व तातडीने माहिती देईल.
मोबाइल व्हेइकल कंट्रोल रूम..
कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव व जोतिबाची चैत्र यात्रा हे दोन महत्त्वाच्या धार्मिक उपक्रमांना लाखो भाविकांची गर्दी होते. शिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी यात्रा होत असतात. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, होत असल्यास तातडीने कळावे, यासाठी मोबाइल व्हेइकल कंट्रोल रूम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला दिले जाणार आहे. या वाहनातच आपत्ती व्यवस्थापनची सर्व यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, एलइडी, बचावाचे साहित्य असणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, पाटबंधारे विभाग ही चार कार्यालये आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने हायटेक करण्याचा विचार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या महिन्यात कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत यावर निर्णय होईल. - अमोल येडगे,जिल्हाधिकारी, कोल्हापूर