कोल्हापूर जिल्ह्यातील ४९७ शाळांचे ‘डाएट’कडून सर्वेक्षण
By संदीप आडनाईक | Published: March 27, 2023 02:00 PM2023-03-27T14:00:55+5:302023-03-27T14:01:55+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन दरवर्षी बाह्य मूल्यांकनाचा उपक्रम राबवत असते. याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन दरवर्षी बाह्य मूल्यांकनाचा उपक्रम राबवत असते. याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) जिल्ह्यातील ‘अ’ दर्जाच्या ४९७ शाळांचे शुक्रवारी सर्वेक्षण केले. यात १२ तालुक्यांतील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीचे ११,५१२ विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वेक्षणावर जिल्हा, राज्य आणि देशाच्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून आहे.
डाएटने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले. शाळांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक संपादणूक या आधारावर कोल्हापूर जिल्ह्यातील या शाळांची पडताळणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. शाळा मानके आणि शालेय मूल्यांकन प्रतिसाद, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन गाभा मानके, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, शाळा विकास व्यवस्थापन समितीचे आयोजन व व्यवस्थापन, उत्पादक समाजाचा सहभाग या घटकांवर या शाळांचे हे सर्वेक्षण झाले. त्यातील निष्कर्षांच्या आधारे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर घालण्यासाठी काही उपक्रम शिक्षण विभाग राबवणार आहे.
या सर्वेक्षणासाठी ४९७ क्षेत्रीय अन्वेषक, १३ तालुका समन्वयक यांच्यासह प्रा. वैशाली पाटील आणि सरिता कुदळे या जिल्हा समन्वयकांच्या मदतीने शाळांचे सर्वेक्षण पार पडले. याच्या तयारीसाठी आठवडाआधी दोन बैठका तसेच विद्यार्थी निवड आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. या मूल्यांकनाचे निष्कर्ष महिन्याभरात जाहीर होतील. -आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.
सहभागी तालुके, शाळा, आणि विद्यार्थी
तालुका - इयत्ता तिसरी (मुले) - पाचवी (मुले) - आठवी (मुले) - एकूण शाळा (एकूण मुले)
करवीर : - २४(४९७) - २३(४८४) - २० (५९०) - ६७ (१५७१)
शाहूवाडी : - ११ (१९९) - ९(१८०) - १५ (३७१) - ३५ (३७१)
राधानगरी : - ७(१६८) - ११(२१२) - १३ (३१२) - ३१(६९२)
हातकणंगले : - २२(४७५) - २२(५५३) - २७ (७७६) - ७१(१८०४)
गगनबावडा : - १(१६) -२(४१) - ५ (११२) - ८(१६९)
पन्हाळा : - १८ (३८७) - १९(४९६) - १० (२९९) - ४७ (११८२)
आजरा : - ६(९७) - ५(८३) - ५ (१३३) - १६ (३१३)
शिरोळ : -१३(३१८) -१४(३०३) -१२ (३४६) -३९ (९६७)
कागल : -११(२६९) -२२(४७१) -१५ (३६८) - ४८(११०८)
गडहिंग्लज :- ११(२००) -७(१२६) -१४ (३२६) - ३२ (६५२)
भुदरगड : -९(१५०) -८(१५२) -११(२९५) -२८ (५९७)
चंदगड : -१६(३१४) -९(१७४) -१५ (३६९) -४०(८५७)
कोल्हापूर महापालिका : -१०(२६६) -१२(२५५) -१३ (३२९) -३५ (८५०)
एकूण : -१५९(३३५६) -१६३(३५३०) -१७५ (४६२६) -४९७(११,५१२)