विधानसभेचे पडघम; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून ईव्हीएम मशीनची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:40 PM2024-08-01T13:40:01+5:302024-08-01T13:41:21+5:30
जिल्ह्यासाठी १८ हजारांवर मशीन दाखल : इच्छुकांच्याही जोरबैठका सुरू
कोल्हापूर : जिल्हा निवडणूक विभागाच्या पातळीवर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारपासून ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, असे १८ हजार ११८ मशीन दाखल झाले आहेत. शासकीय गोडावून येथे ४० दिवस मशीनची तपासणी सुरू राहील.
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे. त्याच्या राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत. पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ज्या उड्या पडल्या, त्यामागेही विधानसभेचेच कारण आहे. मेळावा, सभा, बैठका घेऊन त्यासाठीच्या जोरबैठका इच्छुक मारू लागले आहेत. त्यातच आता निवडणुकीची तयारी प्रशासनाकडूनही सुरू झाली आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात बेल कंपनीचे १८ हजारांवर मशीन दाखल झाले आहेत. या मशीनची प्राथमिकस्तरीय तपासणी शासकीय गोडावून येथे गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी बेल कंपनीचे ६ अभियंते कोल्हापुरात आले आहेत.
नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांची व सहायक पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार जयंत गुरव व शिवाजी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह ३० हमाल कर्मचारी व १० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारपासून पुढील ४० दिवसांत ही प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे हे नियोजन करत आहेत.
अंतिम मतदार यादी २७ तारखेला प्रसिद्ध होणार
निवडणूक आयोगाने पूर्वी दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार होती; मात्र आता त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. नव्या कार्यक्रमानुसार शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. १६ तारखेपर्यंत त्यावरील हरकती स्वीकारल्या जातील. २३ तारखेपर्यंत हरकती निकाली काढल्या जातील आणि २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
जिल्ह्यासाठी दाखल मशीन
बॅलेट युनिट : ८ हजार ४४१
कंट्रोल युनिट : ४ हजार ९४९
व्हीव्हीपॅट : ४ हजार ७२८
एकूण : १८ हजार ११८