कोल्हापूर जिल्ह्यात ३१ नवीन स्वतंत्र महसुली गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:47 AM2018-08-29T00:47:37+5:302018-08-29T00:47:41+5:30

Kolhapur district has 31 new independent revenue villages | कोल्हापूर जिल्ह्यात ३१ नवीन स्वतंत्र महसुली गावे

कोल्हापूर जिल्ह्यात ३१ नवीन स्वतंत्र महसुली गावे

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ३१ महसुली गावे निर्माण केली असून, या ठिकाणी नवीन तलाठी सजे करण्यात आले आहेत. महसूलविषयक कामे प्राधान्याने मार्गी लागावीत, तसेच खातेदारांना विहित मुदतीत सर्व प्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी ही गावे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी दिली.
महसुली गावाच्या निर्मितीमध्ये करवीर तालुक्यात शाहू मिल परिसर, ताराबाई पार्क, कसबा बावडा पूर्व, उचगाव दक्षिण, वरुणतीर्थ, शेंडा पार्क व संभाजीनगर येथे स्वतंत्र तलाठी सजा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता स्वतंत्र तलाठी मिळणार असून त्यांना करवीर तलाठी चावडीत यावे लागणार नाही.
नव्याने निर्माण केलेल्या सजापैकी १० गावांना यापूर्वीच महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित २१ पैकी २० गावांची प्रारूप अधिसूचना (गडहिंग्लज- १, शिरोळ- १, कागल- १, हातकणंगले- १०, करवीर -७ गावे) जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्ड, गावकामगार तलाठी यांच्या चावडी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अधिसूचनेमध्ये नव्याने घोषित महसुली गावांमध्ये अंतर्भूत गट नंबर - सर्व्हे नंबर याबाबतची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. याबाबत संबंधित गावच्या नागरिकांना काही हरकती असतील तर त्यांनी १० सप्टेंबरपूर्वी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन येथे सादर कराव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
महसुली गावे अशी
बड्याची वाडी, वडरगे, (ता. गडहिंग्लज), संभाजीपूर (ता. शिरोळ), कागल पूर्व (ता. कागल), कलानगर गावभाग, शिवाजीनगर, आसरानगर, विवेकानंदनगर, पेठ भाग, जवाहरनगर, शिरोली एम.आय.डी.सी., समर्थनगर, मौजे इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट, शहापूर (ता. हातकणंगले) या ठिकाणी स्वतंत्र महसुली गावे निर्माण केली आहेत.
शिरोलीपासून एमआयडीसी स्वतंत्र
पुलाची शिरोली आणि एम.आय.डी.सी साठी स्वतंत्र गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील महसुली कामांसाठी त्यांचा त्यांना स्वतंत्र तलाठी उपलब्ध होवू शकेल.

Web Title: Kolhapur district has 31 new independent revenue villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.