कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचे दोन बळी_ अनेक ठिकाणी मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:09 AM2018-05-11T01:09:45+5:302018-05-11T01:09:45+5:30
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला, तर यड्रावजवळ दोघे व अब्दुललाट येथे एक महिला जखमी झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठाही खंडित झाला होता.
कोल्हापूर शहर, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर, गडहिंग्लज, गगनबावडा या तालुक्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान झाले.कोल्हापुरात दुपारपर्यंत शहरात कमालीचा उष्मा वाढला होता. सायंकाळी सव्वापाचनंतर वातावरण बदलले.
जोरदार वारे वाहतानाच विजाही चमकू लागल्या. वाºयामुळे पाऊस जाईल असे वाटत असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाºयामुळे शहरभरात ४० हून अधिक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक बंद पडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नागरिकांनी ठिकठिकाणी झाडे बाजूला करण्याचे काम केले. संध्याकाळी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने ठिकठिकाणी कर्मचारी अडकून पडल्याचे चित्र दिसून येत होते.
क्रीडा संकुल परिसरात वाºयामुळे प्रचंड धुळीचे लोट उडत होते. झाडांच्या बिया, पाने, छोट्या फांद्या पडल्याने रस्त्यावर मोठा कचरा दिसून येत होता. त्यामुळे दुचाकीस्वारांनाही गाड्या चालविणे अडचणीचे झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र होते.
यड्रावजवळ दोघेजण, अब्दुललाटेत एक जखमी
हेर्ले-चोकाकजवळ बस शेतात घुसून ३० जखमी
टाकवडेत भिंत कोसळून वृद्धा ठार
कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे चंपाबाई गुंजुटे या गावातील कुडी रस्त्याला शेताकडे कामास गेल्या होत्या. वादळी वाºयामुळे त्या घराकडे परत येत होत्या. पाऊस सुरू झाल्याने बाळासो कोळी यांच्या पोल्ट्री फार्मच्या भिंतीच्या आडोशाला त्या थांबल्या होत्या. मात्र, वादळी वाºयात पोल्ट्रीफार्मची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात त्या जागीच ठार झाल्या.
लव्हटेवाडीत विजांच्या आवाजाने महिलेचा मृत्यू
करंजफेण : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या वळवाच्या पावसाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. घोटवडेपैकी लव्हटेवाडी (ता. पन्हाळा) येथील शिल्पा शिवाजी लव्हटे (वय ३५) यांचा विजांच्या कडकडाटांमुळे बसलेल्या धक्क्याने मृत्यू झाला. शिल्पा लव्हटे या आपल्या मावशी व दोन मुलींसह तळीमाळ या शेतामध्ये भुईमूग काढण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी विजांचा कडकडाट व जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्या घरी परतत असताना जोरदार वीज कडाडली. प्रचंड आवाजाने घाबरून त्या जागीच कोसळल्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीसपाटील विजया कुंभार यांनी पन्हाळा पोलिसांना माहिती दिली. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात नेला. त्यांच्या पश्चात पती, तीन लहान मुली व मुलगा असा परिवार आहे.