‘हेल्थ कार्ड’ बनविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:15 PM2022-09-16T12:15:45+5:302022-09-16T12:16:20+5:30
कार्डवर संबंधित नागरिकांची आरोग्य कुंडलीच समजणार
समीर देशपांडे
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘हेल्थ कार्ड’ काढण्याच्या योजनेमध्ये ६० हजार कार्ड तयार करत कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. या कार्डवर संबंधित नागरिकांची आरोग्य कुंडलीच समजणार असून, यापुढील काळात त्याआधारेच उपचार करण्यात येणार आहेत. सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये ऑनलाइन सिस्टीम आणण्यात येणार असून, त्याचा हा पहिला टप्पा समजला जातो.
‘असंसर्गजन्य रोग, तपासणी व निदान’ यासाठी अशा पद्धतीचे कार्ड तयार करण्याची संकल्पना केंद्र शासनाची आहे. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भमुखाचा कॅन्सर याचा त्रास असणाऱ्या नागरिकांना शोधून काढून, त्यांची तपासणी आणि उपचार करणे अशी ही मूळ योजना आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात हे काम सुरू आहे. हे कार्ड आधारशीही लिंक राहणार आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी, आशा, आरोग्य सेवक, सेविका यांच्याकडून ‘सी बॅक’ हा फॉर्म भरून घेण्यात येत असून, कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेतील हा पहिला परंतु अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही कार्ड तयार झाल्यानंतर नागरिकांनी आपली कार्ड डाऊनलोड करून घ्यायची आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे काम सुरू आहे.
- जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या १२ लाख ५० हजार
- नोंदणी झालेले ८ लाख १३ हजार १५०
- कार्ड तयार झालेले ५९ हजार ९३५
कार्डमध्ये ही असेल माहिती
कुटुंब, त्यातील सदस्य, पत्ता, राहणीमान, पिण्याचे पाण्याचा स्रोत, शौचालय आहे का, याआआधीचे प्रत्येकाचे आजार, झालेल्या शस्त्रक्रिया, याआधी उपचार झालेली ठिकाणे अशा ३० वर्षांवरील सर्वांची माहिती या कार्डमध्ये मिळेल. १४ अंकी नंबर या नागरिकाला मिळेल. त्यानंतरची त्या नंबरच्या आधारेच त्याला आरोग्य सेवा मिळेल.
संपूर्ण माहिती पोर्टलवर
ही संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यात येते. त्यामुळे आगामी काळात तपासणी, उपचार करण्यासाठी ते सहाय्यभूत ठरणार आहे. १४ अंकी नंबर मिळाला की कोणत्याही दवाखान्यात केसपेपर काढावा लागणार आहे. कार्ड निघाल्यानंतर प्रत्येकाला ५ लाख रूपयांचा विमा मिळणार आहे.