कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजार क्विंटलची गरज : २७९० क्विंटल बियाणे उपलब्ध; तयारी खरिपाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 10:44 AM2020-04-30T10:44:11+5:302020-04-30T10:46:30+5:30
राजाराम लोंढे, कोल्हापूर : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली असून यंदा दोन लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप ...
राजाराम लोंढे,
कोल्हापूर : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली असून यंदा दोन लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप पेरणीसाठी आहे. त्यासाठी ३७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून आतापर्यंत २७९० क्विंटल (१२ टक्के) बियाणे उपलब्ध झाले आहे.
‘कोरोना’च्या भयावह वातावरणात मार्च, एप्रिल हे महिने कधी सरले हेच कळले नाही. या सगळ्या वातावरणात बळिराजाच्या नित्यनियमात बदल दिसला नाही. त्याची शेतातील कामे सुरूच राहिली आणि बघता-बघता खरीप हंगाम तोंडावर आला. लॉकडाऊन आणखी किती दिवस राहील, याचा अंदाज कोणालाच येईना. अशा परिस्थितीत खरिपाचा हंगाम घ्यावा लागत असल्याने राज्य शासनाने तयारी केली. शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख ९३ हजार हेक्टरपैकी एक लाख ५५ हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. उर्वरित दोन लाख ५३ हजार क्षेत्र खरिपासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी सर्वाधिक एक लाख १० हजार हेक्टर भातपीक घेतले जाते. खरिपासाठी ३७ हजार २७१ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २७ हजार क्विंटल भात, आठ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते.
वळवाच्या हजेरीने मशागत सोपी
खरीप पेरणीपूर्वी वळवाचे दोन-तीन पाऊस झाले तर मशागत सोपी होते. पेरणीसाठी जमीन लवकर हाताखाली येते. यंदा आतापर्यंत तीन जोराचे पाऊस झाले आहेत. हा पाऊस उसासाठी पोषक असून, विजेच्या कडकडाटासह झालेला एक पाऊस खताच्या डोसासारखा असल्याचे मानले जाते.
बांधावरील खते, बियाण्यांची संकल्पना
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाणे बांधावर पोहोच करण्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. मात्र प्रत्यक्षात हे शक्य आहे का? जिथे शेतकरी गट अथवा १०-१५ शेतकºयांनी एकत्रित येऊन खतांची व बियाण्यांची मागणी करायची. कृषी साहाय्यक शेतकºयांसोबत जाऊन माल खरेदी करण्यास मदत करील. एकत्रित मागणीनुसार त्यांच्या गावात अथवा शिवाराशेजारी पुरवठा केला जातो.
एकूण क्षेत्र- ३ लाख ९३ हजार हेक्टर
ऊस- १ लाख ५५ हजार हेक्टर
भात- २ लाख ५३ हजार हेक्टर
भुईमूग, सोयाबीन- १ लाख हेक्टर
नागली- २१ हजार हेक्टर
ज्वारी - १४ हजार हेक्टर
खरिपासाठी बियाण्यांची गरज- ३७ हजार २७१ क्विंटल
भात- २७ हजार क्विंटल
सोयाबीन - आठ हजार क्विंटल
ज्वारी - १४० क्विंटल
मूग - ६० क्विंटल
---------------------------------
खताची गरज (वर्षभरासाठी) - एक लाख ३२ हजार टन
युरिया- ५३ हजार टन
संयुक्त खते- ७४ हजार ९०० टन
डीएपी- ८ हजार टन
------------------------------------------------
कोट-
कृषी विभागाने खरिपाची तयारी केली असून, गतसालाएवढेच यंदा क्षेत्र राहील. बियाणे व खतांची उपलब्धता असून टप्प्याटप्प्याने बियाण्यांची मागणी केली जाते.
- ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)
----------------------------------